रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे : बाळासाहेब थोरात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 20, 2020

रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे : बाळासाहेब थोरात


रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे : बाळासाहेब थोरात 
मुंबई : कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. येत्या 5 ऑॅगस्टला अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कोरोनाच्या संकटकाळात राममंदिराचे भूमिपूजन इतके महत्त्वाचे आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, श्रीराम दैवत आहे. पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. त्यामुळे केंद्र सरकारने आता माणसं जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मात्र, केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरून दुर्लक्ष करण्याकरता हा राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. तसेच या भूमिपूजन सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याविषयी बाळासाहेब थोरात यांना विचारले असता, तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे, अशी त्रोटक प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मोदी सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. कोरोनामुळं जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करतोय. त्याला आम्ही प्रथम प्राधान्य देतोय. काहींना वाटतंय मंदिर बांधून कोरोना जाईल, म्हणून त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा, असे पवार यांनी म्हटले होते.

No comments:

Post a Comment

Advertise