'विना मास्क' नागरिकांवर विटा पालिकेची धडक कारवाई ; मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या बेधडक कारवाईने नागरिकांसह व्यवसायिकांमध्ये खळबळ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 8, 2020

'विना मास्क' नागरिकांवर विटा पालिकेची धडक कारवाई ; मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या बेधडक कारवाईने नागरिकांसह व्यवसायिकांमध्ये खळबळ


'विना मास्क' नागरिकांवर विटा पालिकेची धडक कारवाई
मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या बेधडक कारवाईने नागरिकांसह व्यवसायिकांमध्ये खळबळ
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या निर्देशानुसार नगरपालिका मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपालिकेच्या पथकाने कारवाई करत दंड वसूल केला.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करीत आहे. विट्यामध्ये प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने करोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर नगरपालिकेच्या पथकाद्वारे कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांनाही मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार आता नगरपालिकेने शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर प्रत्येकी 100 रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई सुरू केली आहे. याची शहरात कडक अंमलबजावणी करत या मोहिमेंतर्गत गेल्या दोन दिवसांत काटेकोरपणे लोकांवर बेधडक कारवाई करण्यात आली.  याशिवाय निर्धारित वेळेत दुकाने बंद न करणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.  कारवाई दरम्यान मास्क लावण्याची समज नागरिकांना देण्यात येत आहे.
मुख्याधिकारी अतुल पाटील, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, नितीन चंदनशिवे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहे. आपल्यासह  इतरांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापरावा, असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise