जगातील पहिले विमान श्रीलंकेचा राजा रावण यानेच वापरले ; श्रीलंका सरकारचा दावा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 22, 2020

जगातील पहिले विमान श्रीलंकेचा राजा रावण यानेच वापरले ; श्रीलंका सरकारचा दावा


जगातील पहिले विमान श्रीलंकेचा राजा रावण यानेच वापरले ; श्रीलंका सरकारचा दावा 
नवी दिल्ली : जगातील पहिले विमान श्रीलंकेचा राजा रावण यानेच वापरले, असा दावा श्रीलंका सरकारने केला आहे. रामायणात खलनायक म्हणून रंगविण्यात आलेल्या रावणाने पाच हजार वर्षांपूर्वी भारतात जाण्यासाठी तसेच परत श्रीलंकेत येण्यासाठी विमान वापरले होते, असे श्रीलंकेने म्हटले आहे. राक्षस राज रावण हाच जगातील पहिला विमान वापरकर्ता असला, तरी ही बाब सिद्ध करण्यासाठी आणखी पुराव्यांची गरज आहे, असे श्रीलंका सरकारला वाटते.
जगातील आद्य विमान तंत्रज्ञानावर आपला दावा सिद्ध करण्यासाठी श्रीलंकेच्या पर्यटन व उड्डयन मंत्रालयाने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मंत्रालयाने एक जाहिरात वृत्तपत्रांत प्रसिद्ध करून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. रावण हाच विमानाचा पहिला वापरकर्ता होता, हे तथ्य सिद्ध करण्यासाठी मदत करू शकणारी काही साधने, माहिती अथवा प्राचीन लिखाण कोणाकडे असल्यास ते सरकारला द्यावे, असे या जाहिरातीत म्हटले आहे.
ही वृत्तवाहिन्यांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, रामायणात जरी रावणाला खलनायक म्हणून रंगविण्यात आले असले तरी तो जगातील पहिला विमान उडविणारा व्यक्ती होता, यावर श्रीलंका सरकारचा पूर्ण विश्वास आहे. रावणाने पाच हजार वर्षांपूर्वीच विमान उडविले होते, असे सरकारचे ठाम मत आहे.
श्रीलंकेचे नागरी उड्डयन प्राधिकरण रावणाच्या विमानाचा अभ्यास करू इच्छिते. अद्ययावत तंत्रज्ञान रावणाने हजारो वर्षांपूर्वी कसे निर्माण केले असेल तसेच उड्डाणासाठी त्याने कोणती पद्धत वापरली असेल, इत्यादी गोष्टींचा अभ्यास यात अपेक्षित आहे. आपल्या दाव्याला पुष्टी देणारे साहित्य आवश्यक आहे, पुराव्यांशिवाय आद्य उड्डयन तंत्रज्ञानावरील श्रीलंकेचा दावा सिद्ध होऊ शकणार नाही, असे सरकारला वाटते. त्यासाठी सरकारने लोकांना पुरावे देण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise