राष्ट्रीय महामार्गाने बाधीत झालेल्यांना मोबादला न देताच काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा : शरद पवार, उद्धव ठाकरेंकडे सादिक खाटीक यांची मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 22, 2020

राष्ट्रीय महामार्गाने बाधीत झालेल्यांना मोबादला न देताच काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा : शरद पवार, उद्धव ठाकरेंकडे सादिक खाटीक यांची मागणी


राष्ट्रीय महामार्गाने बाधीत झालेल्यांना मोबादला न देताच काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा : शरद पवार, उद्धव ठाकरेंकडे सादिक खाटीक यांची मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना बाधीत झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी, स्थावर मालमता आणि फळझाडांचे संपादन न करता, नुकसान भरपाई न देता या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेटण्याचा प्रकार चालविलेल्या ठेकेदार ,पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरीत कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्रजी पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल निवेदना द्वारे केली आहे.गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते नागज दरम्यानच्या शेकडो शेतकऱ्यांची सुमारे दोन अडीचशे हेक्टर जमीन या रस्त्याने बाधीत झाल्याचे बोलले जाते. तसेच या महामार्गालगतच्या अनेक स्थावर मालमत्तांना झळ पोहचलीच शिवाय रस्त्यात येणाऱ्या शेताकडेच्या शेकडो फळ झाडाना विना पंचनामा नेस्तनाबूत करण्यात आले. या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यापूर्वीच रस्त्याने बाधीत होणाऱ्या स्थावर मिळकती, फळझाडांचे, फळबागांचे शेतजमिनींचे रितसर संपादन करणे गरजेचे होते तथापि गेली दोन वर्षे बाधीत शेतकरी, नागरीक , संघटना याबाबत दाद मागत असून ही निर्ढावलेली शासन व्यवस्था आणि संबधीत ठेकेदार याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आले आहेत. भारत हा कृषी प्रधान देश असला तरी आणि शेतकरी कथित राजा असला तरी शेतकऱ्याला,नागरीक, ग्रामस्थांना पोतराजाच्या नजरेने पाहणाऱ्या या व्यवस्थेची लाज वाटते. प्रत्येक वर्षाच्या पावसाळ्याने या महामार्गावरच्या खडीकरण, डांबरीकरण नसलेल्या ठिकाणी चिखल, पाण्याची मोठी दलदल तयार होत असते. अनेक खड्यातून वाट काढत जाणाऱ्या वाहनांना यापूर्वी या कृत्रिम घसरगुंडीने मोठे नुकसान झाले आहे. अनेक अपघातात वाहने उलटली आहेत, कित्येक जणांना जन्माची अद्दल घडली आहे. कराड ते नागज या दरम्यान अशा अनेक ठिकाणच्या पाच फर्लांग, अर्धा, एक किमी च्या पावसाळी घसरगुंडीने वाहनांना डान्स करावे लागल्याचे अनेक दुरचित्रवाहिन्यानी यापूर्वीचदाखवून दिले आहे. घाटनांद्रे फाट्याच्या पुढे अर्धा किमी पासून त्यापुढच्या दीड किलोमीटर परिसरात अक्षरशः महामार्ग रस्त्याने चिखलाच्या रस्त्याचे रूप धारण केले आहे. कोरोणा महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदीने हजारोंच्या पटीत वाहनांच्या ये-जा च्या रहदारीला आळा बसल्याने या महामार्गावरचे संभाव्य मोठ्या अपघाताला आळा बसला असला तरी अनेक छोटया वाहनांच्या तुरळक वाहतूकी दरम्यानही जीवघेणी कसरत करावी लागत आहे. ही स्थिती ( २१/०७/२०२० ) कालपर्यतची आहे.गेल्या वर्षी २७ मे २०१९ रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विट्याच्या प्रांताधिकारी कार्यालयावर बाधीत शेतकऱ्यांनी पहिला मोर्चा काढला होता.९ जुलै २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले गेले, त्यानंतर १५ जुलै २०१९ रोजी विटा पंचायत समिती येथे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, राष्ट्रीय
महामार्गाचे अधीक्षक अभियंता यांच्या संयुक्त बैठकीमध्ये बाधीतांच्या जमीनी, स्थावर मिळकतीचे भुसंपादन करण्यावर एकमत करण्यात आले आणि हे काम महिन्याभरात पुर्णत्वास नेण्याचे आश्वासन देण्यात आले तथापि ते आश्वासनाचे भिजत घोंगडे अद्यापही मार्गी लागले नाही. याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे शेतकरी तक्रारी करीत राहीले, निवेदने देत राहीले पण दाद लागली नाही. २१ जानेवारी २०२० रोजी याच प्रश्नासंदर्भात भिवघाट येथे रस्ता रोको करण्यात आला. विट्याचे प्रांताधिकारी यांनी बैठक बोलावून संबंधित प्रश्नी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्गाच्या संबधीतांना दिले. त्यानंतर ९ मार्च २०२० रोजी संबंधित बाधित शेतकऱ्यांनी मोटर सायकल रॅली काढून आपल्या मागण्या प्रांताधिकारी कार्यालयात दिल्या परंतु अद्याप कराड ,विटा आणि नागज या टप्प्यात मधील राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांना आजपर्यत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नसून भूसंपादन कायदा २०१३ ची पायमल्ली करून संबंधित ठेकेदार ,राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी यांनी जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या खाजगी क्षेत्रात काम केले आहे  परंतु अद्याप कोणतीही कारवाई संबंधित विभागावर, ठेकेदारावर झालेली दिसून येत नाही आणि यामुळे या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना , नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गाने बाधीत झालेल्यांना मोबदला न देताच रस्त्याचे काम रेटणाऱ्या ठेकेदार आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकऱ्यांवर आपल्या शेतकरी हिताच्या महाआघाडीने सरकारने त्वरीत कडक कारवाई करावी आणि बांधीतांना त्यांचा न्याय हक्क सत्वर उपलब्ध करून द्यावा असा आग्रह ही शेवटी सादिक खाटीक यांनी धरला आहे.सदर निवेदनाच्या प्रति, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री जयंतराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिदे, कृषीमंत्री, दादाजी भुसे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दतात्रय भरणे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, कृषी राज्यमंत्री
विश्वजीत कदम यांना पाठवण्यात आल्या आहेत.
No comments:

Post a Comment

Advertise