Type Here to Get Search Results !

सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळा : अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल : या मंत्र्यांनी दिला इशारा


सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळा : अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल : या मंत्र्यांनी दिला इशारा 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 641 कोरोना बाधीत झाले असून ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. अनावश्यक गर्दी टाळावी. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, अशी स्पष्टता जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोविडच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात आजतागायत 641 कोरोना बाधीत झाले असून यापैकी उपचाराखाली सद्यस्थितीत 304 रूग्ण आहेत तर 11 रूग्णांची स्थिती चिंताजनक आहे. तर आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आजतागायत आढळून आलेल्या 641 रूग्णांपैकी ग्रामीण भागातील 474, शहरी भागातील 67 तर महानगरपालिका क्षेत्रातील 100 रूग्ण आहेत. रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ही स्थिती गंभीर आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी तालुकानिहाय कोरोना बाधीत रूग्णांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यात जवळपास 200 कंटेनमेंट झोन असून ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आराखड्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या.
जिल्ह्यात झपाट्याने कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्क, वैयक्तिक स्वच्छता नियम पाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सर्वोतोपरी सहभाग द्यावा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यास व आवश्यक खबरदारी न घेतल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असे स्पष्ट करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत त्या ठिकाणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. 50 वर्षावरील आणि कोमॉर्बिडीटी असणाऱ्या लोकांच्या सर्व्हेसाठी महानगरपालिका क्षेत्रात 20 प्रभागांमध्ये 20 पथके कार्यरत करण्यात आली असून लवकरच हा सर्व्हे पूर्ण करण्यात येईल याचाही आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. 
यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, पुणे, मुंबईहून सांगली जिल्ह्यात आपल्या मूळगावी आलेले चाकरमानी पुन्हा मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी अल्पकालावधीसाठी ये-जा करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास हातभार लागत आहे. अशा लोकांच्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी ये-जा करणे बंद झाले पाहिजे. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाने राज्य आपत्ती दलाकडे मागणी केलेल्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात आलेला असून निधी लवकरच उपलब्ध होईल असे सांगितले.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्याची सद्यस्थितीची माहिती देवून मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे सद्या असणाऱ्या आयसीयु बेडची संख्या वाढविण्याची आवश्यकता सांगितली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies