Type Here to Get Search Results !

चमकोगिरी करणाऱ्या संस्था व कोरोना योध्यांनो जरा जनाची नाही तर ....?


चमकोगिरी करणाऱ्या संस्था व कोरोना योध्यांनो जरा जनाची नाही तर ....?
महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये कोरोनाच्य विषाणूंनी थैमान घालायला सुरुवात केलेली असताना, त्यांना रोखण्यासाठी देशातील व राज्यातील प्रशासन व्यवस्था; पोलीस अधिकारी व कर्मचारी; वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, कोरोनाची तपासणी करणारे लॅब टेक्निशियन व आरोग्य कर्मचारी; महानगरपालिका; नगरपालिका; नगर पंचायत; तसेच ग्रामपंचायत या सर्व स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, प्रशासन, आरोग्य विभाग व त्यांना मदत करणारी स्थानिक पोलिस यंत्रणा, हे सर्वजण कोरोनाच्या आगमनापासून ते आज पर्यंत म्हणजे जवळ-जवळ पाच सहा महिने झाले, आपल्या जीवाच रान करून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य जनतेचं कोरोनापासून संरक्षण व्हावं, म्हणून स्वतःच्या जीवाची  पर्वा न करता, रात्रं-दिवस झटत आहेत. ते सर्वजण स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याचा, अन्नपाण्याचा व कुटुंबाचा विचार न करता जनतेला कोरोना पासून वाचवण्यासाठी प्रबोधन करणे, मास्क घालण्याची सक्ती, घरातून विनाकारण बाहेर न पडण्याची सक्ती, शारीरिक दुरावा ठेवण्याची सक्ती, त्याच बरोबर आपल्या गावातून, तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून दुसऱ्या गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात प्रवेश न करण्याच्या सूचना देत आहेत. वेळप्रसंगी जर ऐकलंच नाही तर, त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाहीचा बडगा उगारून, दंडात्मक कार्यवाही करतात.पण काही ही करून त्यांना कोरोनापासून  वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपले कार्य करत असताना ते कोणत्या पुरस्कार, सन्मान किंवा बक्षिसाची अपेक्षा  करत नाहीत. 'कोरोना पासून देशातील जनतेला वाचवणं, ही आपली नैतिक जबाबदारी आहे ' असं समजून कार्य करत आहेत. केंद्र व राज्य सरकार आणि समाज  कोरोनाच्या विरुद्ध प्रत्यक्ष लढणाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. 
मात्र  महाराष्ट्रातील काही चमकोगिरी करणाऱ्या सामाजिक (? ) संस्था, " ज्यांनी कोरोना पासून जनतेचं रक्षण व्हावं, म्हणून कोणते ही काम  केलेल नसणाऱ्यांना व केवळ चमकोगिरीची हाव असणाऱ्यांना "कोरोना योद्धा" म्हणून पुरस्कार देण्याचा सपाटा सुरू केला आहे. ' खरे तर हे सर्व हास्यास्पद आहे. महाराष्ट्रभर असे पुरस्कार देणाऱ्या समाजसेवी संस्थांचे पेव फुटलेलं आहे. पुरस्कार देणाऱ्या या सर्व सामाजिक संस्थाचे कार्य बोगस व चमकोगिरीचे असल्यामुळे त्या अशा बोगस लोकांना बोगस प्रमाणपत्र व सन्मान देतात. त्याचं कारण ही तसंच मजेदार आहे. बोगस पुरस्कार देणाऱ्या संस्थांचे व बोगस पुरस्कार घेणारे समाजसेवक (? ) यांचे मागे पुढे कुठेतरी लागे-बांधे असतात. म्हणूनच अशा संस्थांचे पदाधिकारी व पुरस्कर्ते, ' तू मला अध्यक्ष म्हण, मी तुला उपाध्यक्ष म्हणतो, दोघे ही चमकत राहू या.' अशा पद्धतीने काम करत असतात. पण या सामाजिक संस्थांच्या व लोकांच्या बोगसगिरीने व चमकोगिरीने समाजाचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण जे खरंच कोरोनाला पराजीत करण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत, अशा प्रशासन, डॉक्टर, नर्सेस, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महापौर व त्यांचे नगरसेवक, नगराध्यक्ष व त्यांचे नगरसेवक, सरपंच व त्यांचे सहकारी सर्व सदस्य आणि ग्रामपातळीवरील आरोग्य सेविका या सर्वांचे मनोधैर्य खच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून "कोरोना योद्धा" म्हणून पुरस्कार देण्याचे पवित्र कार्य खरंच एखाद्या सामाजिक संस्थांना करायचं असेल तर, त्यांनी हे पुरस्कार आपल्या गावात, शहरात व जिल्ह्यात कोरोनाच्या नियंत्रणासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या खऱ्या योद्ध्याना द्यावेत. त्यामुळे आपल्या संस्थेची पुरस्कार देण्याची मनोकामना पूर्ण होईल व कोरोनाच्या विरुद्ध लढणार्याय खऱ्या कोरोना योद्यांना यामुळे प्रेरणा मिळेल व पुन्हा ते मोठ्या उमेदीने कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी पुढे येतील व आपल्या देशातून व महाराष्ट्रातून कोरोनाला पळवून लावतील.  आपल्या संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष काम न करणाऱ्या बोगस लोकांना 'कोरोना योद्धा' म्हणून पुरस्कार दिले तर, आपली संस्था ही बोगस पुरस्कार देणारी संस्था आहे, असा संदेश समाजात जाईल. त्यामुळे किमान समाजाची सेवा करणाऱ्या संस्थांनी तरी सामाजिक कार्य व पुरस्कार वितरण करताना नीतिमत्तेचे भान ठेऊन कार्य करावे. त्यामुळे समाजाचे हित होईल, अन्यथा आपण समाजासाठी विधायक काम करत नसून विघातक काम करत आहात , असा संदेश समाजात जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies