Type Here to Get Search Results !

कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णांनी प्लाझ्मा दान करावा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; प्लाझ्मा थेरपीची यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू : कोरोना बाधीतांच्या मृत्यूच्या कारणमिमांसेसाठी समिती स्थापन


कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णांनी प्लाझ्मा दान करावा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
प्लाझ्मा थेरपीची यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू : कोरोना बाधीतांच्या मृत्यूच्या कारणमिमांसेसाठी समिती स्थापन
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कोरोनातून आपण बरे झाले आहात. इतरानांही या आजारातून बरे करण्यासाठी योगदान द्या. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांच्या प्लाझ्मा डोनेशनमुळे एखाद्या रूग्णाचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे जे रूग्ण बरे झाले आहेत त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, प्लाझ्मा थेरपीची यंत्रणा पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात सुरू झाली असून पात्र दात्यांकडून प्लाझ्मा संकलन करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 5 जणांनी प्लाझ्मादान केले आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, लॉकडाऊनचा कालावधी 31 जुलै पर्यंत राज्य शासनाने वाढविला आहे. त्यामुळे ज्या बाबी आत्तापर्यंत अनुज्ञेय होत्या त्या यापुढेही तशाच अनुज्ञेय राहतील. तसेच ज्या बाबींवर निर्बंध होते ते यापुढेही तसेच राहतील. आता लॉकडाऊन कालावधीत अंत्यविधीकरिता 50 व लग्नसमारंभ करिता 50 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शासन निर्देशाप्रमाणे सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहील. केशकर्तनालय, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स बाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 26 जून 2020 रोजी पारित करण्यात आलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक यापुढेही परवानगी घेऊनच सुरू राहणार आहे.
दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे कोरोना साथीचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, वैयक्तिक स्वच्छता, मास्कचा वापर या नियमांचे पालन करून आपण कोरोनापासून बचावासाठी आटोकाट प्रयत्न करणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणे, मास्क न वापरणे या बाबींना निर्बंध घालण्यासाठी यापुढील काळात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून त्या अंतर्गत दंड व गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
कोरोना बाधीतांच्या मृत्यूच्या कारणमिमांसेसाठी समिती स्थापन
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या 12 असून कोरोना बाधीतांच्या मृत्यूच्या कारणमिमांसेसाठी शासनाच्या सुचनेनुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत रेफरल वेळेत झालेला आहे का, उपचार योग्य पध्दतीने झाले आहेत का, यामध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे का, कोणाची काही चूक झाली आहे का, भविष्यामध्ये अशा प्रकारचे मृत्यू टाळू शकू का, या सर्वांचे विश्लेषण समितीमार्फत करण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, स्थानिक स्तरावरही याबाबत एक्सपर्ट कमिटी स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लोकल एक्सपर्ट कमिटी असावी अशा सूचना शासनाच्या होत्या. लोकल एक्सपर्ट कमिटी ट्रिटमेंट प्रोटोकॉल आहेत त्याला मॉनिटर करेल व आवश्यक सूचना देईल. विभागीय व राज्यस्तरावरील कमिटीशी ही समिती समन्वय साधेल. नवीन येणाऱ्या उपचारापध्दती संदर्भात चर्चा करण्यात येईल. जिल्ह्यात नेमलेल्या डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये एकसमान पॅटर्नचे अनुसरण केले जाईल, असे ते म्हणाले.
अनेकदा रूग्ण त्यांना होणारा त्रास वेळेवर सांगत नसल्यामुळे समस्या गंभीर होते. त्यामुळे नागरिकांनी त्यांना होणारा त्रास वेळीच फिवर क्लिनिक, आशा वर्कर्स, अन्य आरोग्य यंत्रणा यांना अवगत करावा. त्यामुळे वेळेवर निदान झाल्यास पुढील अप्रिय घटना टाळता येऊ शकतात, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनीही कोरोना संशयीत रूग्ण आढळल्यास त्यांच्याकडे ते ॲडमिट करून न घेता शासकीय यंत्रणेकडे त्वरीत संदर्भित करावेत, याबाबत त्यांना सूचना देण्यात येत आहेत.

x

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies