22 जुलै रात्री 10 पासून लॉकडाऊन व जनता कर्फ्यूला सुरूवात ; नागरिकांनी सहकार्य करण्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 20, 2020

22 जुलै रात्री 10 पासून लॉकडाऊन व जनता कर्फ्यूला सुरूवात ; नागरिकांनी सहकार्य करण्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे आवाहन


22 जुलै रात्री 10 पासून लॉकडाऊन व जनता कर्फ्यूला सुरूवात
नागरिकांनी सहकार्य करण्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे आवाहन
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै अखेर लॉकडाऊन ठेवण्यात येईल. या काळात उर्वरित ग्रामीण भागातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यू पाळावा. लॉकडाऊन व जनता कर्फ्यू या दोन्हींमध्ये जनतेने संपूर्ण सहकार्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, सर्वश्री आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.
कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मर्यादीत ठेवण्यात यश आले आहे. प्रशासनाने केलेल्या अंमलबजावणीचे व त्यास लोकांनी दिलेल्या सहकार्याचे हे यश आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या यापुढेही मर्यादित रहावी यासाठी 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै अखेरपर्यंत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये संपूर्ण लॉकडाऊन व उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. जनता कर्फ्यूच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पालन करावे. लॉकडाऊन 22 जुलै रात्री 10 नंतर सुरू होणार असल्याने नागरिकांच्या हातात पुरेसा वेळ आहे. त्यामुळे कोणीही अनावश्यक गर्दी करू नये. खरेदीसाठी झुंबड उडू नये, नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment

Advertise