संपादकीय : स्वदेश प्रेम की स्व प्रेम....! - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 9, 2020

संपादकीय : स्वदेश प्रेम की स्व प्रेम....!


संपादकीय : स्वदेश प्रेम की स्व प्रेम....!
चीनने कोरोना सारखे विषारी व प्राणघातक अपत्य जन्माला घालून भारतासह जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्याचे काम केले आहे. चीन निर्मित कोरोना पासून आपल्या देशातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी भारतीयांनी आपली सर्व शक्ती पणाला लावलेली आहे. याच संधीचा फायदा घेऊन चीनने भारताचा काही भूभाग बळकावण्यासाठी घुसखोरी करून वीस भारतीय जवानांची हत्या केली आहे. आजही अधून मधून पुन्हा भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न चीन करत आहे या सगळ्याचा बदला घेण्यासाठी आत्ता सर्व भारतीयांनी कंबर कसली आहे त्याचाच एक भाग म्हणून  59 चिनी ॲप्स भारताने पूर्णतः बंदी घातलेली आहे. याला पर्याय म्हणून नुकतेच भारतीय बनावटीचे व श्री श्री रविशंकर यांच्या तालमीतल्या 1000 आयटी इंजीनियर्स यांनी तयार केलेले एलीमिनिट्स ॲप नुसतेच लॉन्च केलेले आहे. तसेच भारतासह भारतातील सर्व राज्यांनी वेगवेगळ्या कामाच्या संदर्भात चिनी कंपन्यांच्या बरोबर केलेले सगळे करार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच चिनी बनावटीचा माल चीनमधून खरेदी करून तो भारतात न विकण्याचा निर्णय भारतातील सर्व देशप्रेमी व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे. या सर्व निर्णयामुळे भारताकडून मिळणाऱ्या अब्जावधी रुपयांना चीनला मुकावे लागणार आहे. म्हणजेच भारतीयांकडून चीनची आर्थिक नाकेबंदी करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. हे सर्व निर्णय अंमलात आणत असताना भारताने स्वीकारलेल्या जागतिकीकरण धोरणाच्या मर्यादा ही सांभाळाव्या लागणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करत असताना हे हि लक्षात घेतलं पाहिजे, कि खरंच चिनी बनावटीच्या वस्तुंच्या वर बहिष्कार टाकणारे सर्व व्यापारी देशभक्त आहेत का? नसेल तर चिनी बनावटीच्या स्वस्त आणि कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तू बाजारात येण्यास बंदी घालायची व त्या वस्तूचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर स्वदेशी बनावटीच्या म्हणजेच भारतातील विशिष्ट बाबांच्या व कंपनीच्या वस्तू बाहेर काढून, त्या महागड्या किमती सर्वसामान्य भारतीयांच्या माथ्यावर मारायच्या व अमाप संपत्ती मिळवायची, हा तर या देशातल्या बाबांचा, कंपन्यांचा व व्यापाऱ्यांचा उद्देश नसावा? कारण चीनी वस्तूंच्या स्वस्त दराचा अनेक भारतीय बनावटीच्या महागड्या वस्तूंच्या विक्रीवर परिणाम झालेला आहेत. कोरोना व चीनने केलेले आक्रमण या संधीचा फायदा या कंपन्या, बाबा व व्यापारी यांना उठवायचा आहे का? कारण फार दिवसापासून ' स्वदेशी आपनाओ, देश बचाओ' चा नारा पीटणारी, काही विशिष्ट मंडळी स्वतःच्या व धर्माच्या स्वार्थासाठी देशप्रेमाचे नाटक करत असताना निदर्शनास आलेले आहे. तसेच चिनी बनावटीचे 59 मोबाईल ॲप बंद करून श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयटी तज्ञांनी तयार केलेले ॲप भारतीय बनावटीचे आहेत, ते लॉन्च केलेले आहेत. आता हे सर्व ॲप्स भारतातील सर्व तळागाळातील लोकांच्या हिताचे किंवा उद्धार करणारे असतील का? या विषयी ही शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत, कारण या देशाला जास्तीत जास्त लुटण्याचे काम या देशातल्या धर्मवादी बाबांनी व मंदिरातील भटजीनी केलेले आहे. त्यामुळे पुढच्या काळात ही धर्मवादी, जातीयतावादी व शोषक प्रवृत्तीची माणसं सर्व भारतीयांचे हित लक्षात ठेवून ॲप्स चालवतील का? का विशिष्ट धर्म व विचारसरणीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या ॲपचा वापर करतील? हे ही प्रश्न निर्माण होत आहेत. शिवाय केंद्र शासनाच्या वतीने व भारतातील वेगवेगळ्या राज्यांनी आपली कॉन्ट्रॅक्ट चीनी कंपन्यांना दिलेली होती, ती सर्व कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलेली आहेत, अशा घोषणा केंद्र सरकार व विविध राज्य सरकारांनी केलेल्या आहेत. प्रश्न हा निर्माण होतो की, ही कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी यापूर्वी भारतातील कंपन्या सक्षम नव्हत्या का? असतील तर त्यांना ही कॉन्ट्रॅक्ट न देता चिनी कंपन्यांनाच का देण्यात आली होती? यावेळी स्वदेश प्रेम भारतीयांच्या मनात नव्हते का? आत्ता चीनला दिलेली सर्व कॉन्ट्रॅक्ट रद्द करून भारतातील कंपन्यांना देण्यात येतील का? जर ती कामे करण्यास भारतीय कंपन्या सक्षम नसतील तर ती सर्व कामे रद्द करायची का? सक्षम असतील तर अगोदरच ही कॉन्ट्रॅक्ट भारतीय कंपन्यांना का दिलेली नाहीत? या सर्व बाबीवरून असा अंदाज निघतो की, स्वतःचा स्वार्थ साधता येत असेल किंवा फायदा होणार असेल तर, शत्रूला सुद्धा मित्र म्हणून जवळ घेऊन कवठाळले जाते व जर स्वतःचा फायदा होत नसेल तर, जवळच्या मित्राला सुद्धा शत्रू समजून त्याच्याबरोबर शत्रुत्वाचे व्यवहार केले जातात. अशी भूमिका देश हिताच्या दृष्टीने महत्त्वाची वाटत नाही. शिवाय अशी ही शंका नाकारता येत नाही की, आज ज्या चीनला शत्रू समजून त्यांच्या बरोबरचे सर्व आर्थिक संबंध तोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो कदाचित भविष्यामध्ये बदलू ही शकतो. कारण आज चीन आणि भारत यांच्यामध्ये युद्धजन्य  वातावरण आहे, ते उद्या सौम्य होऊ शकते. अशा वेळी पुन्हा दोन्ही देशानी व देशातील नागरिकांनी स्वदेशीचा मुद्दा बाजूला ठेवून परदेशीचा स्वीकार करणे, हे देशहिताचे होऊ शकत नाही. त्यामुळे भारतातील जनतेने याचा गांभीर्याने विचार करावा व चीन बरोबर नेमके कशा पद्धतीचे संबंध विकसित करायचे? हे निश्चित ठरवावे, एवढीच अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Advertise