संपादकीय : उद्योजकांनी कामगारांविषयी कृतज्ञता पाळावी... - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 6, 2020

संपादकीय : उद्योजकांनी कामगारांविषयी कृतज्ञता पाळावी...


संपादकीय : उद्योजकांनी कामगारांविषयी कृतज्ञता पाळावी...
कोरोनाच्या कठीण प्रसंगात महाराष्ट्रातील सर्व उद्योजकांनी आपल्या उद्योगधंद्याशी निगडित असलेल्या जुन्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये, कारण तुमच्या उद्योग व्यवसायाच्या उभारणीमध्ये या जुन्या कामगारांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. त्यामुळे भलेही पगार कपात करावी लागत असेल तर काही हरकत नाही पण त्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये. काही उद्योजक प्राप्त परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कामगारांच्या कपाती करीत आहेत विशेषतः जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना नोकरीवरून कमी करण्यात येत आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव कामावरून कमी न करता उद्योगाच्या उभारणीमध्ये पाठी मागील दिवसात त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता पाळावी व त्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात कामावरून कमी करू नये. असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे.
एखादा उद्योग उभा करायचा असेल तर त्या उद्योजकाकडे भांडवल, कच्चामाल, कामगार, व्यवस्थापन व बाजारपेठ हे 5 घटक अतिशय महत्त्वाचे असतात. यापैकी एखादा तरी घटक कमी असेल तर उद्योग उभा राहू शकत नाही. प्रत्येक उद्योगांमध्ये व व्यवसायामध्ये कामगार अतिशय महत्त्वाचे असतात एखाद्या उद्योजकाचा उद्योग किंवा व्यवसाय अतिशय भरभराटीला आलेला असतो. याच्या पाठीमागे त्या उद्योजकाच्या पाठीशी कामगार या घटकाचे फार मोठे योगदान असते. एखादा उद्योग सुरु करताना अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून उद्योजकाला जावे लागते अश्या हलाखीच्या वेळी सुरुवातीचे कामगार त्यांना साथ देत असतात. ते सुरवातीच्या काळात कमी अधिक पगाराची अपेक्षा न करता आपल्या कामाला महत्त्व देतात प्रामाणिकपणे काम करून कंपनीतला व त्या व्यवसायाला नावारूपाला आणत असतात. एखाद्या नावाजलेल्या उद्योगांमध्ये केव्हा व्यवसायामध्ये नोकरीला असणे म्हणजे त्यांना मोठेपणा वाटत असतो. त्यांना तो उद्योग, कंपनी किंवा व्यवसाय स्वतःचा आहे असे समजून, जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करतात. आशा उद्योजग राशी एकरूप झालेल्या कामगारांना किंवा नोकरांना कामावरून कमी करणे अन्याय कारक आहे. शिवाय सध्या कोरोणाच्या गंभीर परिस्थितीत त्यांच्यापुढे जगण्याची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. इतरत्र सुरू असणारे छोटे-मोठे रोजगार पूर्णतः ठप्प झालेले आहेत. त्यामुळे अशा जुन्या व एकनिष्ठ असणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये. आजच्या घडीला जरी उद्योगांना कोरोणाच्या वातावरणामुळे अल्पविराम दिलेला असला तरी, काही दिवसांनी हे उद्योग सुरू करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या वातावरणामुळे केवळ रेड झोन विभागातील उद्योग व व्यवसाय सुरु करण्यास परवानगी नाही. मात्र ग्रीन व ऑरेंज झोनमधील उद्योगांना सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. सुरू करण्यात येणाऱ्या उद्योगातून उत्पादित होणारा माल विक्रीसाठी अपेक्षित अशा बाजारपेठा नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कामगारांच्या संदर्भात व माल उत्पादनाच्या विक्री संदर्भात उद्योजक व व्यावसायिक यांच्या पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरी ही भविष्यामध्ये हे वातावरण पूर्ववत होण्याची आशा ग्राह्य धरून पूर्वीच्या सर्व कामगारांना कामावरती पुन्हा रुजू करून घ्यावे. कंपनीच्या किंवा उद्योगाच्या आर्थिक अडचणीमुळे या सर्व कामगारांचा काही प्रमाणात पगार थोडाफार कपात केला तरी ही काही हरकत नाही, मात्र अशा अडचणीच्या वेळी उद्योगांना साथ देणाऱ्या सर्व कामगारांना व सेवकांना त्या व्यवस्थापनाने त्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांच्या सोबत राहणे, अतिशय महत्वाचे आहे. म्हणून उद्योगांमध्ये किंवा व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या कोणत्याही कामगारांना त्या उद्योजकांनी केव्हा व्यवस्थापनाने नोकरीवरून कमी करू नये, कारण सत्ता व संपत्ती माणसांच्या साठी आहे. माणसे सत्ता संपत्तीच्या साठी नाहीत. त्यामुळे जरी उद्योजकांना थोडीफार आर्थिक झळ सोसावी लागली, तरी ही त्यांनी आपल्या, सर्व जुन्या कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा सर्व कामगारांना कामावर ठेवून मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांना आधार द्यावा, ज्यामुळे कोरोना नंतरच्या काळात सदर उद्योग हा एकमेकांच्या हातात हात घालून पुन्हा पूर्ववत जोमाने सुरू होईल, यात अजिबात शंका नाही.

No comments:

Post a Comment

Advertise