संपादकीय : उत्तर प्रदेशात लोकशाही की गुंडशाही.....? - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 5, 2020

संपादकीय : उत्तर प्रदेशात लोकशाही की गुंडशाही.....?


संपादकीय : उत्तर प्रदेशात लोकशाही की गुंडशाही.....?
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे विकास दुबे नावाच्या एका गुंडाने व त्याच्या साथीदारांनी रविवार दिनांक ५ रोजी सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास विकास दुबे याला अटक करण्यासाठी त्याच्या राहत्या घरी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर बेसुमार गोळीबार करून आठ पोलिसांची हत्या केली. त्याच्यावर यापूर्वी एका राज्यमंत्र्यांची हत्या व इतर 60 गंभीर गुन्हे दाखल आहेत. विकास दुबे हा कुख्यात गुंड असून त्याचे राजकारणी लोकांशी व पोलिसांशी ही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. विकास दुबे याला अटक करण्यासाठी कानपूर पोलिसांचे एक पथक त्याच्या घरावर छापा मारणार होते, ही खबर पोलीस छापा टाकण्यास येण्या अगोदरच त्याच्या खबऱ्याकडून त्याला समजली होती, त्यामुळे त्याने पोलिसांच्या वर हल्ला करण्याचे पूर्वनियोजन घरी करून ठेवले होते. घराच्या समोर गेटला जेसीबी मशीन आणून ठेवले होते. तसेच घराच्या छतावर त्याचे इतर साथीदार बंदुकी घेऊन थांबले होते. जेव्हा पोलिसांचं पथक त्याच्या घराच्या समोर आले, तेव्हा या पोलिसांच्या वर विकास दुबे व त्यांच्या साथीदारांनी बेछूट गोळीबार केला व आठ पोलिसांची हत्या करून हे सर्वजण तेथून फरार झाले आहेत. त्या वेळी पोलिसांनी त्याच्या एका साथीदाराला पकडले आहे. विकास दुबे व त्याच्या फरार साथीदारांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने पोलिसांची 25 पथके तनात केलेली आहेत. 
या भयंकर घटनेवरून असे निदर्शनास येते की उत्तरप्रदेशा मध्ये नेमकं लोकशाहीचे राज्य आहे की गुंडशाही चे राज्य आहे...?  योगी सरकार उत्तर प्रदेशात सर्वसामान्य लोकांच्या जीविताचे रक्षण करण्या ऐवजी गुंडशाही पोषण्यास पूरक तर नाही ना...? असा प्रश्न निर्माण होतो. कारण एका राज्यमंत्र्यांच्या खुणासह 60 गंभीर गुन्हे ज्या गुंडावर दाखल आहेत, तो गुंड आपल्या साथीदाराबरोबर मोकाट समाजात फिरतो आहे. त्यांने संपूर्ण राज्यातच नव्हे तर आसपासच्या राज्यात ही आपली दहशत निर्माण केली आहे, तरी ही सरकार त्याच्यावर कठोर कार्यवाही करत नाही. याचं नेमकं कारण काय असावे? जर योगी सरकारने वेळीच या गुंडाचा बंदोबस्त केला असता तर आज या 8 पोलिसांच्या हत्या झाल्याच नसत्या. पाठीमागील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार असताना त्याच्याकडे जाणीवपूर्वक सरकारने व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याची गुंडगिरी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. त्यामुळेच त्याने या आठ पोलिसांच्या वर दिवसाढवळ्या हल्ला करून त्यांची हत्या करण्याचे धाडस केलेलं आहे. पोलिसांच्या हत्या करण्याचे धाडस राजकारणी लोकांचा वरदहस्त असणाऱ्या गुंडाशिवाय इतर कोणी ही करू शकत नाही. मग हे गुंड नेमके सरकारनेच पोसलेले आहेत की काय? असा सवाल निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. जर हे गुंड दिवसाढवळ्या पोलिसांच्या हत्या करण्यास मागे-पुढे पाहत नसतील, तर सर्वसामान्य लोकांच्यावर त्यांची दहशत किती असेल?  याची कल्पनाच केलेली बरी. म्हणून जर उत्तर प्रदेशातील जनतेची रक्षा करणारे पोलिसच सुरक्षित नसतील तर जनता किती सुरक्षित असेल...? विकास दुबे सारखे गुंड व त्याचे साथीदार दिवसाढवळ्या नंग्या तलवारी व बंदुकी यांच्यासह कानपूर सारख्या शहरामध्ये पोलिसांचे हत्याकांड करून आपली दहशत पसरवत आहेत, मग उत्तर प्रदेश सरकार त्यांच्याकडे का डोळेझाक करीत आहे, हे समजत नाही. कदाचित उत्तर प्रदेश सरकारच्या राजकारणी लोकांनी पाळलेले हे गुंड जाणीवपूर्वक समाजात दहशत निर्माण करण्यासाठी सैराट सोडलेले असण्याची शक्यता आहे. या गुंडांच्या कडून आज पर्यंत अनेक जणांच्या हत्या झाल्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे या गुंडांना सरकारने पाठीशी न घालता त्यांच्यावर वेळीच कायदेशीर कठोर कार्यवाही करावी, अन्यथा उत्तर प्रदेशातील लोकशाही व सामान्य लोकांचे जनजीवन दहशतीमुळे विस्कळीत होऊन गुंडशाही बळावल्या शिवाय राहणार नाही. सरकारने व काही पोलिस अधिकाऱ्यांनी पोसलेल्या गुंडगिरीला लगाम लावण्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकारने लोकशाहीला वाचवण्यासाठी विकास दुबे यांच्यासारख्या सर्व गुंडांचा व त्यांच्या साथीदारांचा तातडीने बंदोबस्त करावा, तरच राज्यात लोकशाही व्यवस्थित नांदेल व लोकशाही सुरक्षित राहिली व जनजीवन सुरळीत चालेल. त्यामुळे योगींचे सरकार या गुंडांच्यावर तातडीने कार्यवाही करेल, एवढीच अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Advertise