संपादकीय : आटपाडीत कोरोनाचा मुक्काम, जनता जनार्दन हो सावधान..!!! - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 25, 2020

संपादकीय : आटपाडीत कोरोनाचा मुक्काम, जनता जनार्दन हो सावधान..!!!


संपादकीय : आटपाडीत कोरोनाचा मुक्काम, जनता जनार्दन हो सावधान..!!!दिनांक 25 जुलै रोजी आटपाडी परिसर व तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले 18 रुग्ण निदर्शनास आले आहेत. या सर्व बाधित व्यक्तींच्या सह आटपाडी तालुक्यात एकूण ११४ व्यक्ती या कोरोना बाधित सापडल्या आहेत. 


त्यामुळे संपूर्ण आटपाडी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या 18 संसर्गजन्य रुग्णांपैकी 10 रुग्ण हे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व त्यांचा सहकारी स्टाफ आहे. व उरलेल्या आठ व्यक्तीं पैकी तडवळे येथील 6 व्यक्ती, पात्रेवाडी येथील 1 व्यक्ती, आणि मापटेमळा येथील 1 व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. दुसरी विशेष बाब म्हणजे,  सापडलेल्या 18 पॉझिटिव्ह रुग्ण व्यक्तींच्या पैकी केवळ एकच रुग्ण हा मुंबईहून संसर्गजन्य होऊन आलेला आहे. बाकीचे 17 रुग्ण हे आटपाडी तालुक्यात राहणारे परंतु दुसऱ्या कोरोना बाधित व्यक्तीचा संसर्ग झालेले आहेत. आत्तापर्यंत आटपाडीच्या परिसरामध्ये सापडलेल्या रुग्णांमध्ये जवळ-जवळ सगळेच रुग्ण हे मुंबई, पुणे, अहमदाबाद या सारख्या कोरोनाने थैमान घातलेल्या शहरातून आलेल्या व्यक्तीच आहेत. त्यामध्ये स्थानिक संसर्ग झालेल्या व्यक्तींचे प्रमाण अत्यंत अल्प, म्हणजे नसल्यासारखेच होते. मात्र आज मिळालेल्या रुग्णांच्या माध्यमातून एक धोक्याची घंटा वाजलेली आहे, ती म्हणजे केवळ बाहेरच्या शहरातून आलेल्या व्यक्ती याच कोरोनाच्या संसर्गजन्य व्यक्ती आहेत असे नसून, आता आटपाडी मध्ये कायमस्वरूपी रहिवास असणाऱ्या व्यक्तींना ही कोरोनाने विळखा घालायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आटपाडी परिसरातील सर्व स्थानिक नागरिकांनी घाबरून न जाता, आपल्या आसपासच्या परिसरात वावरणाऱ्या कोरोनाच्या विषाणूंना आपण जाणीवपूर्वक आपल्या पर्यंत व आपल्या कुटुंबा पर्यंत घेऊन येण्यास कारणीभूत ठरू नये. 
त्यामुळे शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्व निर्णयाचे काटेकोरपणे पालन आटपाडी परिसरातील जनतेने करणं आवश्यकच बनलं आहे. अत्यंत आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडायचा प्रयत्न करावा, अन्यथा घरातून बाहेर येऊ नये. तसेच आसपासच्या परिसरातील व्यक्तींच्या बरोबर सुसंवाद किंवा व्यवहार करत असताना, सावधानता बाळगावी. आवश्यक तेथे सॅनिटायझरचा उपयोग करावा. तसेच मास्कचा नियमित वापर करावा. कुटुंबातील व्यक्ती शिवाय इतर व्यक्तींच्या संपर्कात जाणे, शक्यतो 100% टाळावे. जनतेच्या जीवाची काळजी घेऊन सेवा करणारे डॉक्टर्स व त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील स्टाफ हा त्या पलीकडे जाऊन स्वतःची काळजी घेत असतो. मात्र कोरोना संसर्गजन्य व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे अतिशय सावधपने जनतेची सेवा करत असणाऱ्या डॉक्टर्स व त्यांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. तर आपल्यासारख्या सर्वसामान्य व बिनधास्त जीवन जगणाऱ्या व व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना किती सहजासहजी कोरोना आळा घालू शकतो..? याची कल्पना सर्व आटपाडी परिसरातील जनतेने करावी.  
यापुढचा प्रत्येक क्षण कोरोनाच्या संसर्गातून आपण व आपले कुटुंब सुरक्षित राहावे म्हणून काळजी घ्यावी. कोरोनाच संसर्ग झाल्यानंतर काळजी करत बसण्याऐवजी, आपल्यापर्यंत कोरोनाचे विषाणू कसल्या ही परिस्थितीत पोहोचणार नाहीत, याची काळजी घेऊन रोज सायंकाळी जेवणानंतर सर्व कुटुंबियांनी उकळलेल्या गरम पाण्याची वाफ नाकातोंडातून घ्यावी. तसेच कोरोनाचे विषाणू आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून अगोदर ज्या-ज्या उपाययोजना करता येतील, त्या सर्व करून घ्याव्यात. तसेच आपल्या आसपासच्या परिसरात बाहेरच्या गावातून अचानक येऊन स्थायिक झालेल्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंनटाइन करण्यामध्ये कोणतही हयगय करू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीची थोडीफार शंका आली, तरी ही त्यांचे स्वाब तपासण्यासाठी पाठवून द्यावेत. तसेच दुर्दैवाने कोरोनाग्रस्त झालेल्या सर्व गरीब-श्रीमंत नागरिकांनी आपला मोठेपणा व अहम या गोष्टी बाजूला ठेवून वैद्यकीय सल्ला व ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यावी. आजिबात घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी व कोरोनामुक्त व्हावे. जर यामध्ये आपण मोठेपणा व अहम विनाकारण पुढे केला तर, त्यामुळे आपण स्वतः सहकुटुंब व समाजाचा बळी देण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे न विसरता लक्षात ठेवावे. ज्या ठिकाणी डॉक्टर्स व वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी कोरोना पासून स्वतःचा बचाव करू शकत नसतील, तर सामान्य माणसाचे हाल काय होतील याचा विचार करावा. 
तसेच तरुण युवक व युवतींनी ही आपल्या सामाजिक वर्तनावर व व्यवहारावर पूर्णतः नियंत्रण ठेवावे. जेणेकरून आपण स्वतः व आपल्या कुटुंबासह आपला तालुका कोरोणाच्या विषाणूपासून सुरक्षित राहील. याची गांभीर्याने काळजी घ्यावी. अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Advertise