कोरोना लपवू नका, वेळीच उपचाराने रुग्ण बरा होतो : डॉ. मुजावर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 12, 2020

कोरोना लपवू नका, वेळीच उपचाराने रुग्ण बरा होतो : डॉ. मुजावर


कोरोना लपवू नका, वेळीच उपचाराने रुग्ण बरा होतो : डॉ. मुजावर
सांगली : जगभरात कोरोनाने हाहा:कार माजला असला तरी, वेळीच निदान आणि उपचार सुरू झाल्यास बहुतांश लोक त्यातून बाहेर पडू शकतात. हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे, नागरिकांनी कोरोना लपवू नये, त्याला सामोरे जायची मानसिकता ठेवावी असे आवाहन मिरज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. रियाज मुजावर यांनी केले. 
डॉ. मुजावर यांच्या आर्यन हार्ट क्लिनिक मध्ये जिल्ह्यातील पत्रकारांची हृदय कार्यक्षमता तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रविवार ते बुधवार असे चार दिवस पत्रकारांची हृदय तपासणी ईसीजी आणि इको तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.  पहिल्याच दिवशी सांगली मिरज शहरातील चाळीस पत्रकारांनी या तपासणीचा लाभ घेतला.
याप्रसंगी बोलताना डॉ. मुजावर म्हणाले,  पत्रकारांचा वावर समाजातील विविध घटकांमध्ये असतो. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून त्यांनी आव्हानांना सामोरे गेले पाहिजे. तसेच कोरोना बाबत प्रबोधनही करणे ही आजची गरज बनली आहे.  कोरोना काळात हृदयाची कार्यक्षमता श्व,सनाची स्थिती याबाबतची माहिती तयार असेल तर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गंभीर प्रसंगाला सामोरे जाण्याची मानसिकता तयार होते. त्यादृष्टीने या तपासण्या करण्यात येत आहेत. बऱ्याच वेळेला कोरोना रुग्णांच्या बाबतीत वास्तव लपवणे, उशिरा दवाखान्यात जाणे असे प्रकार घडतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. अशा घटना  टाळायच्या तर लोकांनी वास्तवाला सामोरे पाहिजे. त्यामुळे उपचार होऊ शकतात. डॉक्टरांकडे येणाऱ्या काही रुग्णांनी आपली माहिती लपवल्यामुळे काही दवाखाने सील करण्याची वेळ आली. त्यामुळे हजारो लोकांच्या वरील उपचार थांबले आहेत. इतर रूग्णालयावर ताण वाढला आहे. संशयित व्यक्तींनी डॉक्टरांना कल्पना दिल्यास ते स्वतंत्रपणे दुसरीकडे पूर्ण काळजी घेऊन असे रुग्ण तपासू शकतील.  यादृष्टीने पत्रकारांकडून समाजाचे प्रबोधन व्हावे अशी अपेक्षाही मुजावर यांनी यावेळी व्यक्त केली. 
स्वागत मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी केले, प्रास्ताविक परिषद प्रतिनिधी जालिंदर हुलवान यांनी तर आभार जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने सांगली, मिरजेतील पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise