Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020-21 मध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी ; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन


प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020-21 मध्ये  सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी ; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : शासन निर्णय दिनांक 29 जून 2020 नुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात भात, ख.ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या पिकांसाठी महसूल मंडळ / मंडळ गटस्तरावर तसेच, मका व तूर या पिकांसाठी तालुका गटस्तरावर विमा क्षेत्र घटक धरुन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी भाग घेण्याची अंतीम तारीख 31 जुलै 2020 आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
या योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी न होण्याची व विमा हप्ता कर्ज रक्कमेतून वजावट करुन विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सूचना बँकेला देण्याची अंतीम मुदत, नोंदणीच्या अंतीम मुदतीच्या 7 दिवस आधी द्यावी. जे कर्जदार शेतकरी विहीत मुदतीत सहभागी होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहीत धरुन, शेतकऱ्याचा विमा हप्ता विहीत पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल. या योजनेंतर्गत नैर्सगिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास योजनेतील अटी-शर्तीनुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारा व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेवू शकतात. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पन्न हे मागील 7 वर्षापैकी  सर्वाधिक उत्पादनाचे मागील 5 वर्षाचे पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पन्न गुणीले जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित करण्यात येत असल्याचे श्री. मास्तोळी यांनी सांगितले. 
या योजनेंतर्गत भात, ख. ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, तूर, उडीद, मका पिकासाठी जोखिमस्त्र 70 टक्के असून पिकनिहाय प्रति हेक्टर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता व कंसात विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे आहे. भात 600 (30 हजार रूपये), ख. ज्वारी 500 (25 हजार रूपये), बाजरी 440 (22 हजार रूपये), भुईमूग 600 (30 हजार रूपये), सोयाबीन 800 (40 हजार रूपये), मूग 360 (18 हजार रूपये), तूर 500 (25 हजार रूपये), उडीद 360 (18 हजार रूपये), मका 600 (30 हजार रूपये).
प्रतिकुल हवामान घटकामुळे अपूरा पाऊस, किंवा हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकाची अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील पेरणी क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर उगवण अथवा पेरणी / लावणी न झाल्यास सदरची तरतूद लागूआहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादीमुळे अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25 टक्के मर्यादेपर्यत आगाऊ  रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देय राहील. हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित करणे, स्थानिक नैर्सगिक आपत्ती अंतर्गत  पडलेल्या पावसामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्ख्लन, गारपीठ, ढगफूटी अथवा विज कोसळल्यामुळे नैर्सगिक आग यामुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे अधिसूचित पिकाचे नुकसान वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. काढणी पश्चात नुकसान भरपाई हे अधिसूचित क्षेत्रातील, पिक शेतात कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकासाठीच, कापणी पासून जास्तीत जास्त 14 दिवसापर्यंत गारपिट, चक्रिवादळ व त्यामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. स्थानिक नैर्सगिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबर नुसार बाधीत पिक व बाधीत क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत संबधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे. 
या योजनेंतर्गत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या प्राधिकृत बँका/बँक शाखा/प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्था (नोडल बँकमार्फत), व बिगर कर्जदार शेतकरी प्राधिकृत बँका, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), जवळच्या तसेच संबधित विमा कंपनीची कार्यालये, www.pmfby.gov.in या वेब पोर्टलवरून ऑन लाईन अर्ज भरु शकतील. अर्जदाराने आपल्या सोबत आधार कार्ड /आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असेल तर करारनामा/ सहमती पत्र, पेरणी घोषणापत्र आणि बँक पासबुकची झेरॉक्स/मोबाईल क्रमांक इत्यादी अर्जास जोडणे/ ऑनलाईन पध्दतीने जोडण्यासाठी आवश्यक असल्याचे श्री. मास्तोळी यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies