Type Here to Get Search Results !

नागपंचमी दिवशीही अंबामाता मंदिर भाविकांकरिता दर्शनासाठी बंद : अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम ; जिवंत नागाची पुजा व स्पर्धा भरविताना आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करा


नागपंचमी दिवशीही अंबामाता मंदिर भाविकांकरिता दर्शनासाठी बंद : अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम ; जिवंत नागाची पुजा व स्पर्धा भरविताना आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करा
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  कोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे यावर्षी नागपंचमी सणादिवशीही अंबामाता मंदिर भाविकांकरिता दर्शनासाठी बंद राहणार आहे. पोलिस व वनविभागाने नाग पकडले जाणार नाहीत, जिवंत नागाची पुजा केली जाणार नाही याकरिता चोख बंदोबस्त ठेवावा व नागांच्या स्पर्धा भरविताना आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करावे. तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी दिले.
बत्तीस शिराळा येथील नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस वन विभाग उप वनसंरक्षक पी. बी. धानके, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, शिराळा नगराध्यक्षा अर्चना शेटे, मुख्याधिकारी शिराळा योगेश पाटील, उप कार्यकारी अभियंता सांगली एल. आर. शहा, सहाय्यक वनसंरक्षक जी. आर. चव्हाण, नगरसेविका सुनिता निकम यांच्यासह अजित श्रीधर पाटील, सम्राटसिंह शिंदे, अजित आण्णा पाटील, प्रदीप सुतार आदि उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले, शिराळा व आसपासच्या परिसरात जमावबंदी करीता कलम 144 लागू करण्याबाबत उपविभागीय अधिकारी वाळवा व तहसिलदार शिराळा यांनी आवश्यक प्रस्ताव सादर करावा. कोविड-19 च्या पार्श्वभमीवर प्रशासनातील सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार सतर्क व तत्पर रहावे. वनविभागाने गस्ती पथकांची संख्या वाढवून शिराळा व परीसरातील सर्व भागात परीणामकारकपणे कायद्याची अंमलबजावणी करावी.  सर्व शासकीय विभागानी मा. न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. नागपंचमी सणाच्या कालावधीत व्हिडीओग्राफीच्या माध्यमातून चित्रीकरण करावे व आवश्यक तेथे सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. शासकीय यंत्रणासोबतच शिराळा नगरपालिकेच्या वतीने अशासकीय संस्थाव्दारे व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. नगरपंचायत व वनविभागाने शहरातील प्रमुख रस्त्यावर फ्लेक्स, पोस्टर्स व हस्त पत्रीकाव्दारे व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 चे कलम 9 नुसार वन्यजीवास इजा पोहोचविणे हा गुन्हा असून त्याकरिता या कायद्याचे कलम 51 नुसार असे कृत्य करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कैद व 25 हजार रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरदुद आहे. मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार बत्तीस शिराळा व परीसरात नाग / साप पकडू नये किंवा त्यांचे प्रदर्शन करण्यात येवू नये. असे करणे कायद्याने गुन्हा असून तसे केल्याचे निदर्शनास आल्यास त्याची तक्रार पोलिस विभाग किंवा वनविभागाकडे करण्यात यावी. यासाठी वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 कार्यान्वीत करण्यात आला असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies