ॲट्रॉसिटी दाखल केल्याचा राग मनात धरून फिर्यादी व साक्षीदारावर प्राणघातक हल्ला : आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची एनडीएमजेने केली मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, June 3, 2020

ॲट्रॉसिटी दाखल केल्याचा राग मनात धरून फिर्यादी व साक्षीदारावर प्राणघातक हल्ला : आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची एनडीएमजेने केली मागणी


ॲट्रॉसिटी दाखल केल्याचा  राग मनात धरून  फिर्यादी व साक्षीदारावर प्राणघातक हल्ला : आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची एनडीएमजेने केली मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
नातेपुते/प्रमोद शिंदे : दिनांक 25 फेब्रुवारीला समीर नवगिरे याने मिरे येथील जातीयवाद्यांवर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी दाखल केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी अकलूज-म्हाळूंग रोडवर समीर नवगिरे याच्यासह साक्षीदारावर तलवारीने खुनी हल्ला केल्याने सदरच्या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी एनडीएमजेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 1 जूनला दुपारी 3 वा. च्या दरम्यान फिर्यादी सुधीप बाळकृष्ण नष्टे अकलूज येथील आपले काम आटोपून समीर नवगिरे याच्यासह मिरे या गांवी निघाला होता. त्याचवेळी म्हाळूंग रोडवरील काळा मारूती मंदिरापासून काही अंतरावर 10 ते 12 लोक एकत्र थांबल्याचे त्यांना दिसले. यादरम्यान ते गाडीवर पुढे जात असताना अचानक दोघा तिघांनी मोटारसायकल उभी केली व पांडुरंग गायकवाड, सिध्देश्वर जोरवर, विजय भीमराव गुंड यांनी फिर्यादी व समीर नवगिरे याला मोटारसायकलवरून लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर पांडुरंग गायकवाड त्याच्या हातातील लोखंडी तलवारीने मारण्याचा प्रयत्न करून तुम्ही २५ फेब्रुवारीला आमच्याविरूध्द अकलूज पोलिस स्टेशनला खोटी ॲट्रॉसिटी दाखल का केली? ती केस काढून घ्या, नाहीतर तुम्हाला जीवंतच ठेवणार नाही. तुम्हाला लय मस्ती आलीय असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बाजूला उभे राहिलेल्या राजकुमार भिमराव गुंड यानेही हातातील तलवारीने सुधीप नष्टे याच्या डोक्यात मारून जखमी केले. त्याचवेळी पांडुरंग आगतराव गायकवाड त्याच्या हातातील लोखंडी तलवारीने फिर्यादी व समीर नवगिरे यास मारहाण करू लागला. त्यानंतर सिध्देश्वर बजरंग जोरवर याचेजवळ असलेल्या लोखंडी कोयत्याने व राजू मारूती होळकर लोखंडी पाईपने सुधीपच्या पाठीत, अंगावर व पायावर सपासप मारहाण करू लागला. विजय भीमराव गुंड याने लोखंडी पाईपने डाव्या हातावर मारून जखमी केले व महेश मिलींद गुंड, बबलू राजकुमार गुंड, संभाजी आगतराव गायकवाड त्यांच्या हातातील लोखंडी गज व दगडाने हातावर मारहाण करीत होते. त्याचवेळी राजू गुंड याने समीर नवगिरे यास मारहाण करीत असताना “ये म्हारड्या तुला लय मस्ती आली आहे, तुझी मस्तीच जिरवतो. आमचे विरूध्द खोट्या केसेस करतो का?” असे म्हणून त्याच्या हातातील लोखंडी तलवारीने पायावर व शरीरावर मारहाण करून त्याच्या डोक्याचे केस धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने जमीनीवर डोके आपटू लागला. तर सोनू रमेश गुंड हा हाताने लाथा बुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करू लागला. या  जीवघेण्या हल्ल्यामुळे सुधीप नष्टे व समीर नवगिरे जखमी अवस्थेत खाली पडलेले असताना विजय भीमराव गुंड व राजकुमार भीमराव गुंड यांचेजवळ असलेली क्रेटा व ब्रेझा गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होते. तर पांडुरंग गायकवाड व सिध्देश्वर बजरंग जोरवर हे सुधीपच्या हाताच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या व समीर नवगिरे जवळील दहा हजार रोख रक्कम घेऊन शिवीगाळ व दमदाटी करीत असताना अकलूजकडून म्हाळूंगकडे जाणाऱ्या अशोक उर्फ भोला युवराज भोसले व भगवान युवराज भोसले हे मारहाण करणाऱ्या लोकांना थांबवत असताना त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करून सदरचे आरोपी आपल्या गाड्या घेऊन निघून गेले. त्यानंतर अशोक उर्फ भोला भोसले व त्याचा भाऊ भगवान भोसले यांनी सुधीप नष्टे यास अकलूज येथील यशोदा  हॉस्पिटलमध्ये तर समीर नवगिरे यास अकलूज क्रेटीकेअरमध्ये दाखल केले. अशाप्रकारची फिर्याद  अकलूज पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आली आहे ही बाब आंबेडकरी चळवळीचे  नेते विकास धाईंजे व वैभव गीते यांना समजताच ते तात्काळ अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तसेच याबाबत अकलूज पोलिस स्टेशनने पांडुरंग आगतराव गायकवाड, सिध्देश्वर बजरंग जोरवर, दादासाहेब होळकर, राजू होळकर, महेश मिलींद गुंड, संभाजी आगतराव गायकवाड, बबलू राजकुमार गुंड, राजकुमार भिमराव गुंड, विजय भिमराव गुंड, सोनू ऊर्फ गणेश रमेश गुंड, रावण वामन जोरवर या आरोपींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3(1)(r)(s), 3(2)(v), 3(2)(va) सह भादंवि कलम 307, 326, 329, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 नुसार 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सदरच्या आरोपींना अटक करून मोक्काअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी विकास धाईंजे व वैभव गीते यांनी पोलीस अधिक्षक सोलापुर यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise