Type Here to Get Search Results !

विट्यातील श्वेता स्टील फर्निचर शोरुमला आग; कोट्यावधी रुपयांचे नुकसान


विट्यातील श्वेता स्टील फर्निचर शोरुमला आग; कोट्यावधी रुपयांचे नुकसान
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : विटा येथील कराड रस्त्यावर असलेल्या श्वेता स्टील फर्निचर या शोरुमला शॉर्टसर्किटने आग लागून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. या आगीत फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यासह शोरुममधील साहित्य जळून खाक झाले. सदरची घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास विटा येथे घडली.
विटा येथे उद्योजक कुमार पवार यांचे कराड रस्त्यालगत श्वे्ता स्टील फर्निचर नावाचे भव्य शोरुम आहे. विटा शहरातील प्रसिद्ध फर्निचर दुकान म्हणून या शोरुमचा नावलौकिक होता. पवार यांच्या शोरुमच्या पाठीमागे त्यांचा स्वतःचा फर्निचर तयार करण्याचाही कारखाना आहे. शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. मध्यरात्री वारा असल्याने ही आग बाजूलाच असलेल्या फर्निचर शोरूममध्ये गेली. त्यावेळी या भीषण आगीने संपूर्ण शोरुमला वेढा टाकला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर सांगली महानगरपालिका, विटा, तासगाव, आष्टा नगरपालिका, सोनहीरा, क्रांती साखर कारखाना यासह सुमारे आठ ते दहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला समारे सहा ते सात तासाचा प्रयत्न करावा लागला. त्यानंतर आग काही अंशी आटोक्यात आली. तोपर्यंत या आगीत शोरुममधील सोफासेट, खुर्च्या, डायनिंग टेबल, बेड, लोखंडी व लाकडी कपाट यासह अन्य किमती साहित्य व नूतनीकरण केलेले भव्य शोरूम जळून खाक झाले. त्याच्या बाजूला भांडी दुकान आहे. हे दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies