Type Here to Get Search Results !

संपादकीय : कोरोनाला प्राधान्य की शिक्षणाला.......!


कोरोनाला प्राधान्य की शिक्षणाला.......!
कोरोना सारख्या महामारीने देशाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले आहे. या महामारीच्या भीतीने लोकांनी आपल्या गतीशील जीवनाला ब्रेक देऊन आपल्या घरात बंदिस्त करून ठेवलेलं आहे. काम, धंदे, रोजगार, नोकऱ्या या सर्वांना विश्रांती देवून टाकली आहे. अशा परिस्थितीत समाज विकासाचा आधारस्तंभ असलेली शिक्षण प्रक्रिया ही विस्कळीत झाली आहे. यामध्ये सन 2019- 20 या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम परीक्षा, त्याच बरोबर सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाचा जून महिन्यात होणारा शैक्षणिक प्रारंभ यांचा ही समावेश आहे. शिक्षण हा समाज विकासाचा मूलभूत घटक असल्यामुळे कोरोनाच्या महामारीचा त्यावरती कोणताही परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाची बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत कोणाला घाबरून शिक्षणाची प्रक्रिया थांबवायची नाही, विद्यार्थ्याचे आरोग्य अबाधित राखून शिक्षणाची प्रक्रिया कसल्याही परिस्थितीमध्ये जून महिन्या पासून सुरू करायची, असा आदेश दिला आहे. कोरोना मुळे शिक्षण प्रक्रियेत कोणता ही अडथळा येऊ शकनार नाही, हे महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दाखवून द्यायचे आहे, असा सल्ला ही शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत दिला. ते म्हणाले की, विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेऊन जिथे प्रत्यक्ष शाळा सुरू करता येतील तेथे शाळा सुरू कराव्यात व जेथे शाळा सुरू करता येणार नाहीत, तेथे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू झाले पाहिजे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड, राज्यमंत्री, बच्चू कडू, आमदार कपिल पाटील, अप्पर मुख्य सचिव, श्रीमती वंदना कृष्णा या बरोबरच ज्येष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. रघुनाथ माशेलकर, शिक्षण तज्ञ, डॉ. अनिल पाटील व अनिरुद्ध जाधव हे मान्यवर उपस्थित होते. सदरची बैठक जवळ-जवळ तीन तास चालू होती. शिक्षण मंत्रालयाच्या इतिहासातील ही विशेष बाब आहे की, मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागासाठी तीन तास बैठक घेऊन चर्चा केली. खरे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण विषयक विचारांचा प्रभाव विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पडल्याचा दिसतो. कारण एकीकडे कोरोनाचे विषाणू संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात नंगानाच करीत आहेत. तरी ही त्याला न डगमगता शिक्षणाची गंगा अविरतपणे प्रवाहित राहिली पाहिजे. कारण 'शिक्षण' हे समाज विकासाचा मूलभूत पाया आहे. याची खात्री मुख्यमंत्री महोदयांना झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन ऑनलाइन, ऑफलाइन, दूरदर्शन,  टीव्ही या सारखे जे-जे पर्याय उपलब्ध आहेत, त्या  सर्व पर्यायांचा वापर करून चालू शैक्षणिक वर्ष जून पासून सुरु करायचेच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी सरकार कडून लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यात कोणता ही हलगर्जीपणा केला जाणार नाही, असे आश्वासन त्यानी दिले. यातून एक गोष्ट लक्षात येते की, मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून कोणत्याही परिस्थितीत किती ही खर्च आला, तरी न डगमगता शिक्षण प्रक्रिया अविरतपणे चालू ठेवायची व संपूर्ण देशासमोर व जगासमोर आदर्श निर्माण करायचा की, कोरोना सारख्या भयानक स्थिती मध्ये ही आरोग्यसंबंधी चे सर्व नियम व्यवस्थितपणे पाळून उत्तम शिक्षण प्रक्रिया चालू केली आहे. मुख्यमंत्री महोदयांची शिक्षण विषयक ही कळकळ सर्व शिक्षण संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक समजून घेतली व योग्य त्या सर्व सूचना व दक्षता लक्षात घेऊन शैक्षणिक प्रक्रिया उत्तम रीतीने गतिमान करण्यास सहकार्य करावे. पिढ्यानपिढ्या जो बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला होता, त्या समाजाला महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व छत्रपती शाहू महाराज या सारख्या थोर महापुरुषांच्या प्रेरणेने मिळालेले शिक्षण सुरक्षित राहील. एकीकडे देशातील प्रस्थापित राजकारणी व सनातनी मंडळी बहुजनांच्या हातून शिक्षण हिरावून घेण्याचा अतोनात प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला शिक्षणाच्या संबंधातील हा निर्णय निश्चितच देश हिताचा व समाजहिताचा आहे, यात किंचितही शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies