संपादकीय : बहुजन मंत्री, खासदार,आमदार, नेते व कार्यकर्त्यांनो शहाणे व्हा..! - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, June 28, 2020

संपादकीय : बहुजन मंत्री, खासदार,आमदार, नेते व कार्यकर्त्यांनो शहाणे व्हा..!


संपादकीय : बहुजन मंत्री, खासदार,आमदार, नेते व कार्यकर्त्यांनो शहाणे व्हा..! 
केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या किंवा नसणाऱ्या सर्व बहुजन मंत्री, खासदार, आमदार ,नेते व कार्यकर्त्यानो सावध रहा. एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा की, प्रस्थापित पक्षांच्या वतीने तुम्ही आता ज्या  मंत्री, खासदार, आमदार, नेता किंवा कार्यकर्ते या पदावर आहात, त्यासाठी त्या  पक्षांनी त्या पदासाठी तुम्ही लायक आहात म्हणून तुम्हाला सन्मानाने घेतलेलं नाही, तर तुमची जात व तुमच्या पाठीमागे असणारे तुमच्या जातीच्या मताचे गाठोडे पाहूनच तुम्हाला त्या पदावर बसवलेले आहे. त्यामुळे बहुजनांच्या वरील पदाधिकाऱ्यांनी स्वतःला आपल्या पार्टीचा किंवा पक्षाचा पाईक समजण्याचे काही ही कारण नाही. जरी तुम्ही स्वतःला आपल्या पक्षाचे निस्सीम भक्त समजून पक्षाच्या हितासाठी रात्रंदिवस काम करू लागला, तरी ही त्या पक्षातील मालक असणारे प्रस्तापित नेते कधी तुमच्या टिंब टिंब वर लाथ मारून बाहेर काढतील, हे सांगता येणार नाही. किंवा चुकून तुमच्याकडून पक्षाला बदनाम करणारी एकादी घटना घडली, तरी ही तुम्हाला खड्यासारखे उचलून बाजूला करतील. त्यामुळे तुम्हाला पक्षासाठी फार चांगलं ही करता येणार नाही आणि वाईट ही करता येणार नाही, म्हणून आपणास एक नम्र विनंती आहे की, प्रस्थापित राजकीय पक्षाने तुम्हाला तुम्ही ज्या जातीची व्होट बँक म्हणून घेतलेलं आहे, किमान त्या जातीला न्याय द्यायचा प्रयत्न करा. त्या जातीशी संबंधित निर्माण झालेले वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त सत्तेचा आणि पदाचा वापर करा. केंद्रातील व राज्यातील जे विद्यमान प्रस्थापितांचे पक्ष आहेत, त्या पक्षांचे प्रस्तापित जातीचे पुढारी, स्वतःला पक्षाचे हुकूमशहा किंवा मालक समजतात. आपली जात सोडून बाकीच्या सर्व बहुजन जातीच्या पदाधिकाऱ्यांना ते स्वतःचे नोकर किंवा गुलाम समजतात. याला केंद्रीय स्तरावरचा किंवा राज्य स्तरावरचा एकही पक्ष अपवाद नाही. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना हे सर्व प्रस्तापितांचे पक्ष आहेत. या प्रत्येक पक्ष्यांच्या प्रस्तापित नेत्यांकडून पक्षाच्या हितासाठी किंवा पक्षाच्या विरोधात एखादी कृती किंवा विचार व्यक्त झाले तर, त्यांच्यावर कोणती ही कार्यवाही होत नाही. उलट दोन्हीकडून ही त्यांचं रक्षणच केले जाते. दिल्लीमध्ये राज्य घटनेची प्रत जाळणाऱ्या प्रस्तापित व्यक्तीला याच प्रस्थापित जातीनी अभय दिले होते. मात्र एखाद्या पक्षातील बहुजन नेत्याकडून किंवा पदाधिकार्यांाकडून पक्षविरोधी  कृती झाली तर त्याच्यावरती भविष्यात बहिष्काराची कार्यवाही होऊ शकते. जर त्याच्याकडून पक्षाच्या अति हिताची कृती घडली तर त्या पक्षातील वरिष्ठ प्रस्तापित त्याला अतिशहाणपणा समजतात व नंतरच्या निवडणुकीत अशा अति शहाण्याचे तिकीट कापले जाते किंवा त्याला शह देण्यासाठी त्याच्याच जातीतला दुसरा उमेदवार उभा केला जातो. कधी-कधी या प्रस्थापित पक्षातील बहुजनांचे काही नेते  स्वतःला त्या पक्षांचे सर्वेसर्वा समजतात . तेव्हा अशा अति शहाण्या बहुजन नेत्यांच्या मार्फत दुसऱ्या पक्षातील बहुजन नेत्यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य किंवा कृती करायला भाग पाडले जाते. हा अति शहाणा नेता हे पूर्ण विसरलेला असतो की, आपण ही बहुजन आहोत. कारण या देशातले प्रस्थापितांचे पक्ष जाणीवपूर्वक बहुजनांच्या मध्ये आपसात भांडण लावून, मतभेद निर्माण करून  स्वतःची राजकीय पोळी त्यावर भाजून घेतात. या पक्षातल्या बहुजन नेत्यांच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की स्वतःला ठेकेदार समजणारे पक्षांचे मालक बहुजन नेत्यांना एकमेकाच्या विरोधात भडकावून आपलीच बोटे, आपल्याच डोळ्यात घालत असतात. त्यामुळे या प्रस्थापित आता त्यांच्या पक्षातील सर्व बहुजन मंत्री, खासदार , आमदार, नेते व कार्यकर्ते यांना जरी एखाद्या प्रस्थापित पक्षाने त्यांच्या स्वार्थासाठी व आपल्या जातीसाठी आपणास प्रतिनिधित्व दिलेले असेल तर प्रामाणिकपणे आपण आपल्या जातीला व बहुजन समाजाला जास्तीत जास्त चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करावा व आपल्याच एखाद्या बहुजन नेत्यांच्या विरोधात उभा राहणं शक्यतो टाळावे कारण उद्या आपल्यावरती सुद्धा मग तशाच पद्धतीची वेळ येऊ शकते. हे शक्य होत नसेल तर ज्या पक्षांची आपण साखरी करतो गुलामी करतो अशा पक्षांच्या टिंब टिंब वर लाथ मारून बहुजनांच्या पक्षाचं खंबीरपणे नेतृत्व करावं व  राज्यातच नव्हे तर देशात बहुजनांची सत्ता निर्माण होईल, यासाठी एकत्र येऊन प्रस्थापितांच्या विरोधात लढा द्यावा.

No comments:

Post a Comment

Advertise