Type Here to Get Search Results !

अजनाळे परिसरातील वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईचे सावट ; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज


अजनाळे परिसरातील वाड्या-वस्त्यांवर  पाणीटंचाईचे सावट ; लोकप्रतिनिधींनी  लक्ष देण्याची गरज  
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : अजनाळे ता.सांगोला, जि. सोलापूर गावातील  वाड्या-वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या अजनाळे गावातील वाड्या-वस्त्या वरील पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने त्वरित टँकर चालू करून वाड्या-वस्त्या वरील राहणाऱ्या नागरिकांची सोय करावी अशी मागणी वाड्या-वस्त्या वरील राहणाऱ्या नागरिकांमधून केली जात आहे. अजनाळे गावातील  वाड्या-वस्त्यावर  राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मात्र  या परिस्थितीचे गांभीर्य “ना लोकप्रतिनिधींना ना अधिकारी वर्गाला याचे देणेघेणे नाही” त्यामुळे वाड्या-वस्त्या वरील राहणाऱ्या नागरिकांमधून नाराजीचा सूर येत आहे. निवडणुका आल्या की तुमच्या भागातील पाण्याचा प्रश्न निश्चित सोडवू अशी पोकळ आश्वासने पुढाऱ्यांकडून दिली जातात. मात्र निवडणुका झाल्या की पुन्हा परिस्थिती जैसे थे. अशी अवस्था वाड्या वस्त्यावर  राहणाऱ्या नागरिकांची झाली  आहे. 
अजनाळे गावातील अंतर्गत पाटीलमळा, मनसादेवी लाडे मळा, कोळवले मळा, समर्थ नगर, भंडगे वस्ती, धांडोरे वस्ती या वाड्यावर  पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करून येथील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडावा अशी येथील राहणाऱ्या नागरिकांमधून मागणी वेळच्या वेळी केले जाते. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून या मागणीला केराची टोपली दाखवली जात आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत  निवडणुकीच्या अगोदर वाड्या-वस्त्यावर  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी वाड्या-वस्त्या वरील राहणाऱ्या नागरिकांमधून केली जात आहे. 
लाखो रुपये खर्च करून मसादेवीवस्ती येथे ग्रामपंचायतीने  पिण्याची पाण्याची टाकी बांधली आहे. मात्र अद्याप पर्यंत या टाकीमध्ये पाण्याचा एक थेंबही आला नाही. सन २००९-१० यावर्षी टाकीचे काम पूर्ण झाले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले असून टाकीला गळती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाणी साठवून राहत नाही.   त्यामुळे  ही टाकी असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रावसाहेब भंडगे यांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून चार-पाच वर्षांपूर्वी पाईपलाईन केली होती. स्थानिक पुढाऱ्यांनी याचा मोठा गाजावाजा करत पुजन ही केले. मात्र तरीदेखील या वस्तीला आज तागायत पाणी  सोडले नाही.  त्यामुळे येथील राहणाऱ्या  नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies