Type Here to Get Search Results !

खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट उपलब्ध करणार ; अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, डॉक्टर्स साठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याचा आग्रह


खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट उपलब्ध करणार
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, डॉक्टर्स साठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याचा आग्रह
मुंबई : कोविड 19 व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्या  मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निदेश मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.
कोविड 19 विषाणू प्रादर्भावाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. कोविड 19 संदर्भात जनमानसात असलेली भीती दूर होणे आवश्यक आहे. ताप, कोरडा खोकला, अशक्तपणा, अर्धशिशी, नाक चोंदलेले असणे अशा स्वरुपाची लक्षणे दिसत असल्यास लगेच चाचणी करणे गरजेचे आहे. पण अशी चाचणी डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय करता येत नाही आणि अनेक डॉक्टरांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतल्याशिवाय रोग्यांची तपासणी करणे योग्य वाटत नाही. त्यांची यासंदर्भातील काळजी दूर करण्यासाठी  त्यांना महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरमार्फत पीपीई कीट पुरविण्यात यावेत, असे श्री. ठाकरे यांनी निदेश दिले. येत्या पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. या आजारांची आणि कोविड 19ची लक्षणे सारखी असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिकांची आणि  शासनाची रुग्णालये ही कोविड 19 साठी रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारासंदर्भात खाजगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असणार आहे. या रुग्णालयांच्या कर्मचारी वर्गाकरिता सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणे गरजेचे आहे. म्हणून केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies