चुका करणार मिशीवाला, शिक्षा मात्र दाडीवाल्याला......!! - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 24, 2020

चुका करणार मिशीवाला, शिक्षा मात्र दाडीवाल्याला......!!


चुका करणार मिशीवाला,  शिक्षा मात्र दाडीवाल्याला......!!
चीनमध्ये जन्माला आलेला कोरोणा ज्या पद्धतीने चीनमधून वेगवेगळ्या देशांमध्ये मार्गस्थ झाला, तसाच तो भारतामध्ये ही दाखल झाला. भारतातील राष्ट्रीय विमानतळावरून वेगवेगळ्या राज्यांमध्ये व राज्यातील मोठ्या शहरांमध्ये त्याने आपलं बस्तान बसवलं. पण आज तो फक्त मोठमोठ्या शहरांमध्येच थांबला नाही, तर हळूहळू छोट्या शहरांच्या कडे व ग्रामीण भागातील खेड्याकडे मार्गक्रमण सुरू केलं आहे. त्यामुळे खेड्यातील सर्वसामान्य जीवन जगणारी जनता कोरोणाच्या आगमनामुळे एकीकडे दहशतीच्या वातावरणात खाली आपलं जीवन जगत आहे. तर दुसरीकडे मोलमजुरी व काम-धंदा बंद झाल्यामुळे अन्नावाचून तडफडत आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे अतोनात नुकसान होत आहे. हा कोरोना चा प्रवास चीनमधून भारतातील खेड्यांच्या पर्यंत झालेला असला तरी हा प्रवास एकट्या कोरोनानें केलेला नाही. कारण कोरोना एक विषाणू आहे, तो फक्त माणसाबरोबर फिरतो. म्हणजे चीनमधील कोरोणाच्या विषाणूला भारतात घेऊन येण्याचे काम भारतातील काही मुराळ्यानी केलेलं आहे.  या मुराळ्यांनी आपल्या सोबत कोरॉनाला  वाजत-गाजत आपल्या देशात आणलेलं आहे. तसेच भारत सरकारला कोरोणाच्या आगमनाची चाहूल लागलेली असताना ही त्याला रोखण्याऐवजी त्याचे विमानतळावर जंगी स्वागतच केले.
म्हणजे कोरोना भारतामध्ये आलेला नाही, त्याला आणलेलं आहे. मग कोण गेले होते चीनला...?  खेड्यातील शेतकरी...?, शेतमजूर....? का सामान्य गरीब जनता...? यापैकी कोणी ही कोरोणाला घेऊन आले नाही.  कोरोणाला घेऊन येणारी मंडळी ही सर्व श्रीमंत व धनवान आहे. कोण शिक्षणाच्या निमित्ताने चीनला गेले, कोण व्यापाराच्या निमित्त चीनला गेले, कोण पिकनिक साठी चीनला गेले. या सर्व धनवान व श्रीमंत लोकांच्या मुळेच कोरोणाचे विषाणू भारतात आले, आणि त्यांनी ज्यांचा काही ही दोष नसणाऱ्या सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला त्रस्त केलेलं आहे. मुंबई,  पुणे, नागपूर, ठाणे, सोलापूर या सारख्या मोठ-मोठ्या शहरांमध्ये कोरोनानें थैमान घातले आहे. या शहरातील जनता आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी शहराकडून खेड्यांकडे येत आहे. शहरातून खेड्याकडे येणाऱ्या या लोकांच्या सोबत कोरोना खेड्यात पोहोचलेला आहे. सुरुवातीला जानेवारीमध्ये कोरोनाचे आगमन भारतात होऊ शकतं, याची चाहूल भारत सरकारला लागलेली असताना, त्यांनी ताबडतोब सर्व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करायला पाहिजे होती, पण त्याकडे दुर्लक्ष केलं. दिल्लीसारख्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यास दिलेली परवानगी रद्द करता आली असती परंतु त्याकडे ही दुर्लक्ष केलं. त्यामुळे देशातील मोठ्या शहरांना कोरोणाने विळखा घालायला सुरुवात केली आहे. आता शहरातील नागरिक हा कोरोना आपल्या सोबत घेऊन खेड्यात दाखल झालेला आहे. खरे तर केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने शहरातील या लोकांना शहरांमध्येच ठेवून मूलभूत अत्यावश्यक सुविधा पुरवल्या असत्या, तर या लोकांचे खेड्याकडे येणारे लोंढे थांबले असते.  त्यामुळे खेड्यातील जनता कोरोनाच्या विषाणूपासून बचावली असती. पण याकडे ही सरकारने गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसत नाही. केंद्रसरकार फक्त अधिकार वापरण्याचा प्रयत्न करत आहे, पण कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या याकडं दुर्लक्ष करताना दिसते. त्यामुळे सरकारने किमान निर्दोष खेड्यातील लोकांना कोरोना पासून वाचवण्यासाठी शहरातील लोंढे शहरातच थांबवले पाहिजेत किंवा त्यांची तपासणी करून कोरोनाचा संसर्ग झाला नाही, याची खात्री करून तसे प्रमाणपत्र देऊनच ग्रामीण भागाकडे पाठवणे अपेक्षित आहे.अन्यथा ग्रामीण जनतेचा कडीचा ही दोष नसताना ही कठोर शिक्षा भोगावी लागत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise