Type Here to Get Search Results !

रूग्णांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांची थेट कोविड वॉर्डाला भेट ; पॉझिटिव्ह रूग्णांना प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस


रूग्णांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांची थेट कोविड वॉर्डाला भेट
पॉझिटिव्ह रूग्णांना प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस
माणदेश एक्सप्रेस न्युज
अमरावती : जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी रूग्णालयातील कोविड वॉर्डाला भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांना दिलासा दिला.
गत काही आठवड्यांपासून जिल्हा कोविड रूग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रूग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी घेतला व तत्काळ तो अंमलातही आणला. पालकमंत्र्यांनी सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील स्थापित कोविड रूग्णालयाला भेट दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा कोविड रूग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. त्यांनी तेथील कोविड वॉर्डात थेट जाऊन त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांची टीम अहोरात्र मेहनत जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता  काम करत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रूग्णसेवा देत असते. आज मी स्वत:  पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला. उन्हाळ्याचे दिवस असताना पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्त मिळाला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवारत आहेत, असे यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोविड रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी मी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्टर व इतर कर्मचा-यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची मी स्वत: विचारपूस केली. त्यावेळी सर्व दाखल रूग्णांनी आपणास समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. डॉक्टर रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी अत्यंत चांगले काम करत असल्याची माहिती या सर्व रूग्णांनी दिली. जिल्ह्यात अद्यापपर्यंत 212 रूग्ण आढळून आले आहेत. त्यातले 120 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच रूग्णालयात त्यांनी उपचार घेतले आहेत.
आढळलेल्या रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक रूग्णांवर याच रुग्णालयातून उपचार होऊन ते बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार होत आहेत. डॉक्टर व त्यांची टीम या रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.  आपण कोविड रुग्णालयातील प्रत्येक दाखल व्यक्तीला भेटून विचारपूस केली आहे.  प्रत्येक वॉर्डाला भेट दिली आहे. रुग्णांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. डॉक्टर व आरोग्य यंत्रणा रूग्णांसाठी व समाजासाठी देवदूत ठरली आहे. या काळात सर्वांनी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे मनोबल टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे व एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करून त्यावर मात करूया, असे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies