संपादकीय : जनतेची साथ, कोरोनावर मात....! - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 25, 2020

संपादकीय : जनतेची साथ, कोरोनावर मात....!


संपादकीय : जनतेची साथ,  कोरोनावर मात....! 
भारताच्या एकूण कोरोनाग्रस्तांच्या पैकी जवळ-जवळ तीस टक्के कोरोनाग्रस्त व्यक्ती महाराष्ट्र मध्ये आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रांजळपणे मान्य केले आहे. कोरोना चा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या देशातील एकूण संख्येच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये जास्त आहे पण याचे कारण ही तसेच आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर यासारखी मोठ-मोठी गर्दीची शहरे वसलेली आहेत. या शहरांच्या मध्ये मोठे उद्योग-धंदे व व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे या उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ देशातील विविध राज्यांमधून मुंबई,  पुणे, नागपूर या शहरांमध्ये स्थलांतरित झालेलं आहे. त्यामुळे या शहराची लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. तरी ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढच्या पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील लॉकडाऊन संपविण्याचा अंदाज व्यक्त करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याचा लॉकडाऊन हा 31 मे या तारखेपर्यंत असून त्यानंतर हा लॉकडाऊन पुढे चालू ठेवायचा किंवा बंद करायचा ?  हे सगळं जनतेवर अवलंबून आहे. जर जनतेने सरकारला योग्य ते सहकार्य करून कोरोना ग्रस्तांची संख्या नियंत्रित करण्यास मदत केली, तर निश्चितपणे लॉकडाऊन चा कालावधी संपविण्यात येईल.  पण पुन्हा जनतेने सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्स न ठेवता गर्दी करण्यास सुरुवात केली, तर दुर्दैवाने पुन्हा सगळं बंद करून लॉकडाऊन ची अंमलबजावणी करावी लागेल. 31 मे या तारखेच्या नंतर  महाराष्ट्रातील ग्रीन झोन बरोबरच रेड झोन मधील  दुकाने, उद्योगधंदे व व्यवसाय सुरू  करण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी आज पर्यंत जवळ-जवळ 70,000 उद्योगांना उद्योग सुरू करण्याच्या मान्यता देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 50,000  उद्योग सध्या सुरू झालेले आहेत. या  उद्योगात जवळ-जवळ सहा लाख कामगार पुन्हा आपल्या कामावर रुजू झालेले आहेत. त्याच बरोबर त्यांनी असे ही आव्हान केले आहे, की ज्या उद्योगांना मनुष्यबळ कमी पडेल त्या-त्या उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या कडून उपलब्ध होणे आवश्यक आहे.
 उद्धव ठाकरे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा केली, की महाराष्ट्र सरकार कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पूर्णतः सज्ज आहे. या अगोदर कोरोनाचे पेशंट गुणाकार पद्धतीने वाढत होते, त्यांच्यावरती निश्चितपणे सरकारने नियंत्रण आणलेलं आहे . मात्र मोठ्या शहरातून आपल्या गावाकडे स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना निदर्शनास येत आहेत. त्या वरती ही सरकार निश्चितपणे येत्या 31 तारखेपर्यंत नियंत्रण आणेल, असा विश्वास आहे. सरकारला सत्तेवर येऊन केवळ सहा महिने कालावधी झालेला आहे . या कालावधीत मांडलेला अर्थसंकल्पा मधील आव्हाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतानाच कोरोनाने देशामध्ये व महाराष्ट्रात प्रवेश केला.  सध्या कोरोणाला नियंत्रित करण्यात सरकार यशस्वी होत आहे, यात मुळीच शंका नाही. पण याच बरोबर आम्ही राज्यातील अर्थचक्र कसं चालणार याचाही गांभीर्याने विचार करून तशी उपाय योजना करीत आहोत.  राज्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे त्यांच्या बांधावर नेहून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याच बरोबर सत्तर ते ऐंशी टक्के कापूस खरेदी करण्याचा विचार ही आम्ही करीत आहोत. तसेच कोरोना मुळे सर्वसामान्य आणि गरीब जनता अन्नावाचून उपाशी राहणार नाही, याची ही काळजी घेत आहोत. पुढील पंधरा दिवसात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्पिटल व 13 ते 14 हजार बेडस् उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. या सर्व धावपळीमध्ये आम्हाला जनतेची साथ अपेक्षित आहे असे आवाहन ही उद्धव ठाकरे यांनी केले. जर दिलेल्या सूचनांचे जनतेने योग्य ते पालन करून स्वतः चे कोरोना पासून रक्षण केलं तर निश्चितपणे पुढचा लाकडाऊन संपवण्यासाठी मदत होईल. व कोरोनाला आपण आपल्या महाराष्ट्रातून व देशातून कोरोनाला पळवून लावण्यात सफल होऊ यात मुळीच शंका नाही.

No comments:

Post a Comment

Advertise