Type Here to Get Search Results !

भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन हे कटुनीती व द्वेषाचे राजकारण : किरण साठे


भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन हे कटुनीती व द्वेषाचे राजकारण : किरण साठे
माणदेश एक्सप्रेस न्यूज
अकलुज : महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीना महाराष्ट्र सरकारबद्दल मनामध्ये राग आहे आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा मनामध्ये मोठ्या प्रमाणावर राग असून हातात आलेली सत्ता गेल्याने ते तर सैरभैर झाले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी भाजपच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत आणि प्रशासकीय नियंत्रण अतिशय योग्य प्रमाणात राबविण्यात येत आहे. जगासह देशामध्ये कोरोनावर लस उपलब्ध नसल्याने जगातील देश हतबल झाले आहेत आणि ते कोरोनाचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरले असताना महाराष्ट्र राज्यातील भाजपच्या विरोधी पक्षनेते व प्रदेश अध्यक्ष यांना फक्त महाराष्ट्र राज्यच कोरोनाचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरले असल्याचे दिसणे हे कटू नीती व द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोपही किरण साठे यांनी केला आहे.
राज्यामध्ये व सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊन नये यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून काम करतांना दिसत आहेत. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा त्यांचे मनोबल खच्ची करण्याचे काम भाजपचे विरोधी पक्षनेते व प्रदेश अध्यक्ष करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधी यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची देणी देण्याचे सूचनाही चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते यांनी द्याव्यात म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुखी होतील.असा टोलाही किरण साठे यांनी सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना लगावला आहे. महाराष्ट्र राज्याबद्दल एवढेच प्रेम होते तर मग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोळा केला जाणारा निधी हा मुख्यमंत्री फंडामध्ये जमा करण्या ऐवजी तो प्रधानमंत्री फंडामध्ये जमा करण्याचे आवाहन भाजपच्या वतीने का करण्यात आले? त्यावेळेस भाजपवाले म्हणू शकत होते की अगोदर मुख्यमंत्री फंडामध्ये निधी जमा करून ज्यांना प्रधानमंत्री फंडामध्ये निधी जमा करायाचा आहे त्यानी जमा करावा असे आवाहन भाजपच्या लोकांनी करायला हवे होते. भाजपच्या प्रदेश अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांना जर महाराष्ट्र राज्याबद्दल प्रेम असेल तर केंद्राकडे असलेला आपल्या राज्याचा हक्काचा हजारो कोटी रुपये देण्यासाठी आंदोलन करून दाखवावे असा उलट प्रश्नही विचारला आहे.
महाराष्ट्र बचाव म्हणण्याचा नैतिक अधिकार भाजपने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री फंडामध्ये निधी देण्याची मागणी करण्याऐवजी त्यांनी प्रधानमंत्री फंडामध्ये निधी जमा करण्याचे आवाहन केले त्यावेळेसच गमावला आहे, त्यामुळे त्यांच्या तोंडामध्ये महाराष्ट्र बचाव हा शब्द शोभून दिसत नसल्याचेही म्हटले आहे. राज्य कोरोनाच्या विरुद्ध लढाई लढत असताना राज्याला साथ देण्याऐवजी भाजप हे असले नौटंकीबाज आंदोलन करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे,मात्र जनता आता भाजपच्या या आंदोलनाचा धडा त्यांना नक्कीच शिकवेल यात मात्र शंका नाही. जनता उघड्या डोळ्याने पाहतेय की कोण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करतय आणि त्यामध्ये कोण आडकाठी करत आहे. त्यामुळे भाजपच्या या फसव्या आंदोलनाला जनता बळी पडणार नसल्याचे सांगून भाजपच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी हल्लाबोल केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies