कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आटपाडीतील सर्व रस्ते बंद - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 19, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आटपाडीतील सर्व रस्ते बंद


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आटपाडीतील सर्व रस्ते बंद
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : आटपाडी शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण असून शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी अक्षरक्ष झोडपून काढले. त्यामुळे नागरिकांनी बाहेर येण्याचे टाळले. तालुक्यावर कोरोना चे संकट येऊ नये म्हणून शासकीय यंत्रणा काम करीत आहे. दिल्लीहून आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याने समजताच प्राथमिक आरोग्य विभाग, प्रशासन, पोलीस खाते यांनी दक्षता घेत पूर्ण शहरामध्ये नाकाबंदी केली. साईनगर राजारामबापू हायस्कूल ते बायपास रस्ता, बस स्थानक, मुख्य पेठ, शेटफळे रोड, सांगोला चौक, ग्रामपंचायत चौक, दिघंची रस्ता तसेच शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये जाणारे रस्ते बंद करण्यात आल्याने विनाकारण ये-जा करणाऱ्यांची पंचाईत झाली. पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरून दुचाकीवरून फिरणाऱ्या प्रत्येकाकडे कसून चौकशी करत होते.
चौकात ठीक ठिकाणी युवकांना पोलिसांनी झोडपून काढले. नाकाबंदी केल्यामुळे रस्त्यावरील गर्दी आपोआप कमी झाली. भाजी मंडई ओस पडली. सकाळी दहानंतर संपूर्ण शहरभर हालचाली बंद झाल्या. गाव आणि शहरात येणारे सर्वच मार्ग बंद करून टाकल्याने शंभर टक्के लॉकडाऊन आहे अशी ध्वनीपेक्षा वरून नागरिकांना सूचना करण्यात येत होत्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी धास्ती घेतली असून स्वतःला घरातच बंदिस्त करून घेण्यावर भर दिला.

No comments:

Post a Comment

Advertise