पुन्हा...राईनपाडा....तेही...पोलिसासमक्ष आठवतय का? - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, April 20, 2020

पुन्हा...राईनपाडा....तेही...पोलिसासमक्ष आठवतय का?


पुन्हा...राईनपाडा....तेही...पोलिसासमक्ष आठवतय का? 
धूळे जिल्ह्यात राईनपाडा या आदिवासीबहूल भागात चोरीच्या संशयावरून ५ भटकेविमूक्त समूहातील व्यक्तिंना स्थानिक जमावाने काठी, कूऱ्हाडी, दगड, गज व सापडेल त्या साधनांनी अक्षरश: सामूहिक कत्तल केली, हा मॉब लिंचींगचा जीवंत प्रकार होता हे सातत्याने समाजात आजही घडत आहे.
 तसाच प्रकार काल परवा पालघर जिल्ह्यात घडला. तशाच आदिवासीबहूल भाग, दोन गोसावी या भटकेविमूक्त समूहातील व्यक्तींची चोरीच्या संशयावरून, पोलिस स्टेशनच्या समोरच,तेही पोलिसांच्या साक्षीने दगड, काठ्या व गजाने, भगवी कफनी धारण केलेल्या वृध्द व्यक्तिंची स्थानिक बेकाबू, क्रूर जमावाने मॉब लिंचींगचा प्रकार केला. त्या गोसावी व्यक्तिचा अक्षरश: चेंदामेंदा करून टाकला. तडफडून तो देह ऩिपचीत पडला, आणि मगच जमाव शांत झाला.!
ही घटना अंगावर शहारे आणणारी आहचे, माणूसकीला काळीमा फासणारी आहे. चांगूलपणावरून विश्वास उडवणारीसूध्दा आहे. 
 व्यक्ती, जात व समूहाबद्दल व्देष, तिरस्कार व हेटाळणी किती खोल मानवी समाजात रूजली आहे, याचा हा सर्वसामान्य जिताजागता नमूना आहे. सूशिक्षित समाजातील दांभिक व सहिष्णूतेचा बूरखा पांघरलेले अनेक महाभाग म्हणतात की, पुर्वीसारख्या आता कूठे जातीयता, अस्पृश्यता व भेदभाव उरला आहे. सगळीकडे समानता आहे. सर्व लोक समाजात कूठेही,कसेही वावरू, संचार करू शकतात. भेदाभेद, विषमता, जातीभेद केव्हाच संपला आहे. परंतू सातत्याने घडणाऱ्या घटनातून हे दावे किती पोकळ आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. अशा डोळ्यावर झापडं लावलेल्या लोकांना खैरलांजी, खर्डा, राईनपाडा, दादरी, अल्वर, जामखेड प्रकरण आठवून, काय काय घडले ते समजून घेतले तर मग लक्षात येईल की, या सर्व झालेल्या हत्या, खून व मॉब लिंचींगचेच प्रकार घडवले गेले होते ते फक्त जाती, धर्मावरूनच घडलेले आहेत. 
प्रस्थापित व्यवस्थेपासून फक्त हे वेगळ्या समाजाचे लोक आहेत, यांना मुख्य समाजात स्थान नाही. जो भेदाभेद आहे, तसाच राहिला पाहिजे. यांना सामील करून घ्यायचे नाही. यांना जातीव्यवस्थेत निम्न स्थान आहे, त्याच पायरीवर यांनी खितपत पडायचे. त्यांनी कोणताही हक्काधिकार, मानपान, पद, सन्मान मिळवायचा नाही, मागायचा नाही. कायदे, नियम, संविधान फक्त कपाटात ठेवून देवून द्यायचे.  इथे रोज जगताना व व्यवहार करताना आम्ही मनूस्मृतीव्दारेच करणार, समाजात हा पूर्वापार खोल रूजलेला समज असा सतत समाजातील अमानवी हैवानाकडून उस्फूर्तपणे बाहेर पडत असतो. मग तो कोणत्या चोरीच्या संशयावरून असो, प्रेमप्रकरणातून असो, गावात अतिक्रमण करून रहिवास करण्याच्या कारणावरून असो, मूले पळवणारी टोळी म्हणून उठलेली अफवेवरून असो की गोमाता प्रकरणावरून असो. बेधूंद जमाव, असा काही हल्ला करतो की, त्यात निरपराध असो की दोषी, त्याची खातरजमा न करता, एखाद्याचा जीव घेतल्याशिवाय तो शांतच होत नाही, अशी आपली ही प्रस्थापित व्यवस्था, आणि त्यातील ही अक्रमिक असमानता. ना जमावावर कायद्याचा धाक, ना संविधानातील मानवी मूल्याचे रक्षण, ना व्यक्ती स्वातंत्र्याचा लवलेश ना, देशात निर्भयपणे संचाराचे स्वातंत्र्य, काहीही घडले तरी कायदा हाती घेऊन आम्हीच तातडीने सजा देणार हा इथला हिटलरी कायदा? गेल्या २०१४ पासून तर देशात हम करसो कायदा अस्तित्वात आला आहे. विवेकी वर्तणूक, मानवी मूल्यांचा ऱ्हास झाला आहे. सर्व समाज बेशिस्त, बेकाबू बनला आहे. समाजातील प्रवाहाचा गावगाड्यात सहभाग नसणाऱ्या समूहांचा व्देष, तिरस्कार व भेदभाव करून त्यांना, अमानवी विषमतापूर्वक वागणूक मिळत आहे. 
भटक्या जाती पूर्वीपासून समाजबाह्य व गावकूसाबाहेर,शीवेच्या पलीकडे आसरा घेतात, राहतात.
तोही त्यांच्यापासून हिरावून घेतला जात आहे. ब्रिटीशकालीन कायद्याची व संशयाची साक्ष अजून समाजात रूजलेली आहे, ती अशा प्रकरणातून लोक जाणीव करून देत असतात. यातून सूटका अजून तरी भटक्यांना मिळण्याची शाश्वती दिसत नाही. अनूसूचित जाती, जमातींना संवैधानिक हक्क मिळाले, हे बरे झाले. काही प्रमाणात कायद्याव्दारे त्या बांधवांची सूटका झाली तरी समाजातील विवेकनितीमत्ता, माणूसकी न्याय द्यायला अजून तयार नाही. समाजातील निम्नतम व गलीतगात्र असणाऱ्या भटके विमूक्तांना सध्यातरी स्वातंत्र्याची पहाट दूरच आहे, असे वाटत राहते? बाकी, सवलती, आरक्षण, प्रतिनिधीत्व राहू द्या हो, किमान आम्हाला माणूस म्हणून तरी वागणूक द्या!
अजून किती पालघर, राईनपाडा, तळेगाव, करून आमची माणसे मारून टाकणार आहात? ही भटकेविमूक्त समूहाची आर्त किंकाळी ना समाज ऐकतोय, ना सरकार, ना कायदा,,,,,?

प्रा.स्वप्नील सूगावे, पुणे

No comments:

Post a Comment

Advertise