Type Here to Get Search Results !

गर्दी टाळा अन्यथा कठोर कारवाई करणार ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


गर्दी टाळा अन्यथा कठोर कारवाई करणार ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एकस्रेस न्युज
सांगली :  जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.  तसेच अशा वस्तुंच्या आस्थापनांना वेळेचे कोणतेही बंधन घातलेले नाही. त्यामुळे लोकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी कोठेही गर्दी करू नये अथवा साठेबाजी करू नये, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गर्दी केल्यास व अनावश्यक घराबाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, खाजगी व सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू याबाबत प्रशासनाने निर्देशित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. स्वत:बरोबरच स्वत:च्या कुटुंबाचीही काळजी घ्या. सद्याचा काळ अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे स्वत:चा व कुटुंबांचा जीव धोक्यात न घालता गर्दीच्या ठिकाणी जाणे, घराबाहेर जाणे टाळा. अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री करणाऱ्या आस्थापनांनी गर्दी टाळून सुरक्षित अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे. तसेच जिल्ह्यात दि. 23 मार्च पासून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
चुकीचे, गैरसमज निर्माण करणारे, फेक मेसेज सोशल मीडियातून फॉरवर्ड केले जात आहेत. त्यांच्यावर सायबर सेल मार्फत कारवाई करण्यात येत असून लोकांनी असे संदेश पाठवू नयेत. याबाबत ग्रुप ॲडमिननी सर्वोतोपरी दक्षता घ्यावी. अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.
जिल्ह्यांतर्गत, जिल्ह्याच्या सीमांवर चेक पोस्ट लावण्यात आले असून जिल्ह्यात येणारे अनावश्यक लोक जिल्ह्यात येत असतील तर त्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच शहरांतर्गत वाहतूक नियंत्रणासाठीही चेक नाके स्थापन करण्यात आले आहेत. याच्या माध्यमातून होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले लोक फिरत असताना आढळल्यास सक्तीने इंस्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये पाठविण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. अशा पध्दतीने आतापर्यंत फिरताना दोन व्यक्ती आढळल्या असून त्यांना इंस्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये पाठविण्यात आले आहे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया ही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मिरज येथे कोरोना चाचणीसाठीची लॅब आठवडा अखेर पर्यंत उभी रहात असून आवश्यक साधन सामग्री उपलब्ध होत असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची तजवीज करण्यात आलेली आहे. या लॅबमुळे मोठा फायदा होणार असून तपासणीनंतर सात ते आठ तासात तपासणीचा अहवाल उपलब्ध होणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies