भारताचा धावांचा डोंगर; न्यूझीलंड ला ३४८ धावांचं आव्हान ; श्रेयस अय्यरचे पहिले वनडे शतक ; विराट, राहुलची अर्धशतके - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, February 5, 2020

भारताचा धावांचा डोंगर; न्यूझीलंड ला ३४८ धावांचं आव्हान ; श्रेयस अय्यरचे पहिले वनडे शतक ; विराट, राहुलची अर्धशतके


माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे मध्ये भारताने धावांचा डोंगर उभा करताना ३४८ धावांचे आव्हान दिले. भारताकडून श्रेयस अय्यर वन डे मध्ये आपल्या पहिल्या शतकाची नोंद. कर्णधार विराट कोहलीने वन डेतील 58 वे अर्धशतक पूर्ण केले. तर के.एल. राहुलने पुन्हा एखादा ३ चौकार व ६ षटकार मारत तडाखेबंद फलंदाजी करताना नाबाद ८८ धावांचे योगदान दिले. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ५० षटकात ३४७ धावा करीत न्यूझीलंड ला ३४८ धावांचं आव्हान दिले
वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या भारतीय सलामीवीरांनी साजेशी सुरुवात केली. दोघांनी आठ षटकांत अर्धशतकीय भागीदारी केली. पण, आठव्या षटकातील अखेरच्या चेंडूनं ही जोडी तोडली. कॉलीन डी ग्रँडहोमनं पृथ्वीला ( 20) यष्टिरक्षक टॉम लॅथम करवी झेलबाद करून माघारी पाठवले. पुढच्याच षटकात मयांकही माघारी परतला. टीम साउदीच्या गोलंदाजीवर पॉईंटवर उभ्या असलेल्या टॉम ब्लंडेल यानं अप्रतिम झेल टीपत मयांकला ( 32) तंबूत जाण्यास भाग पाडले. 
कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. श्रेयसने बचावात्मक खेळ केला आणि कोहली दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी करत होता. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाची सरासरी सहाच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न केला. विराटनं वन डेतील 58 वे अर्धशतक पूर्ण करताना भारताला मोठ्या आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. 
विराट अन् श्रेयसची 102 धावांची भागीदारी इश सोढीनं सुंपष्टात आणली. तो 63 चेंडूंत 6 चौकारांसह 51 धावा करून तंबूत परतला. खेळपट्टीवर तग धरलेल्या श्रेयसनेही अर्धशतक पूर्ण केले. 
खेळपट्टीवर स्थावरल्यानंतर लोकेशनंही फटकेबाजी चालू केली. त्यानं टीम साउदीच्या एकाच षटकात लागोपाठ दोन खणखणीत षटकार खेचले. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये श्रेयस आणि लोकेशनं तुफान फटकेबाजी केली. 84 धावांवर असताना श्रेयसचा झेल कॉलीन डी ग्रँडहोमनं सोडला. श्रेयस आणि लोकेश यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं कूच करून दिली.  श्रेयसनं वन डे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावले. त्याला लोकेशची तोडीसतोड साथ मिळाली. या दोघांची चौथ्या विकेटसाठी  136 धावांची भागीदारी टीम साउदीनं संपुष्टात आणली.  
श्रेयस 107 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 103 धावांवर मिचेल सँटनरच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर लोकेश व केदार जाधवनं फटकेबाजी केली. भारतानं 50 षटकांत 4 बाद 347 धावांचा डोंगर उभा केला. लोकेश 64 चेंडूंत  3 चौकार व 6 षटकारांसह 88 धावांवर नाबाद राहिला. 

No comments:

Post a Comment

Advertise