Type Here to Get Search Results !

स्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे सर हे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करत आहेत - भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजयाताई रहाटकर; स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे हे उंब्रजच्या ‘ग्लोबल कृष्णा गौरव’ पुरस्काराने सन्मानित.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पंढरपूर‘ प्रतिनिधी : समाजात अनेक रत्ने आहेत, त्यांना पारखून प्रयत्नपूर्वक जगासमोर आणण्याचे काम ग्लोबल नॉलेजने केले आहे. स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांसारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्व लाभलेल्या शिक्षणतज्ञास पुरस्कार प्रदान करण्यात आला हे भाग्यच आहे. कारण अलीकडच्या काळात राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात ‘पंढरपूर पॅटर्न’ची जोरदार चर्चा होत असताना ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित करून डॉ. रोंगे सर हे स्वेरीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवित आहेत.’ असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी केले.
         उंब्रज (ता. कराड, जि.सातारा) मधील ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेजच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्धल गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांना महाराष्ट्राच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्या हस्ते ‘ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार’देऊन सन्मानित करण्यात आले. हा मानाचा पुरस्कार ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर बोलत होत्या. ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष महेशकुमार जाधव म्हणाले की, ‘दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या डॉ. बी.पी.रोंगे सरांना हा पुरस्कार दिल्यामुळे पुरस्काराचेच महत्त्व आणखी वाढले आहे. त्यांनी गोपाळपुरच्या माळरानावर फुलविलेल्या नंदनवनामुळे पंढरपूर आणि पंचक्रोशीतील अनेक मुलामुलींचे नशीब उघडले असून एखादा माणूस शून्यातून विश्व कसा निर्माण करु शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच डॉ.रोंगे सर होय.’ श्री.शेखर चरेगावकर म्हणाले की, ‘कर्म, कर्तव्यभावना आणि कर्तुत्व अंगी असलेल्या डॉ. रोंगे सरांनी घरची परिस्थिती बिकट असतानाही शिक्षण संकुल उभे करण्याचे स्वप्न पहिले आणि ते पूर्ण केले. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. स्वेरी संकुल पाहता शैक्षणिक क्षेत्रात डॉ. रोंगे सरांचे नियोजन मला सर्वोत्तम वाटते.’ सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती डॉ. रोंगे म्हणाले की, ‘या पुरस्कारामुळे शिक्षण क्षेत्रात मी करत असलेले काम आणखी बळकट झाले असून अधिक जबाबदारीने शैक्षणिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्ही आणि तथाकथित मित्र या तीन गोष्टीपासून दूर राहिले तर यशस्वी होऊ शकतात.यासाठी पाल्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी स्वेरीच्या यशातील टप्पे सांगितले. यावेळी सातारा येथील जिल्हा परिषद व नियोजन समितीचे सदस्य मनोजदादा घोरपडे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कविता कचरे, ओ बी सी मोर्चाचे अध्यक्ष अॅड.विशाल शेजवळ, अॅड. दीपक थोरात, महेंद्रकुमार डुबल, सौ. प्रेमलता रोंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन महेशकुमार जाधव यांनी कले तर निलेश साबळे यांनी आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies