Type Here to Get Search Results !

सिडकोने पोलिसांसाठी विशेष गृह प्रकल्प उभारण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
मुंबई : सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करतांना त्यात पोलिसांसाठी विशेष गृहबांधणी प्रकल्पांचा समावेश सिडकोने आपल्या धोरणात करावा, असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यामध्ये पोलिसांसाठी घरे निर्मितीची संख्या देखील वाढली पाहिजे. महानगरांमध्ये विविध विकास प्राधिकरणाच्या मार्फत बांधल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पोलिसांसाठी घरे असली पाहिजे, असेही नगरविकास मंत्र्यांनी यावेळी सांगितले. 
वांद्रे येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सभागृहात नगरविकास मंत्र्यांनी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको या विभागांच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. नगरविकास मंत्री श्री.शिंदे म्हणाले, पोलीस १२ तास सेवा बजावतात शिवाय त्यांना घरी येण्या जाण्यासाठी किमान तीन-चार तासांचा प्रवास करावा लागतो. या सगळ्याचा परिणाम त्यांना सेवा बजावताना होतो म्हणून पोलिसांसाठी हक्काची घरे आवश्यक आहे. त्यामुळे सिडको नवी मुंबईत सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचे जे प्रकल्प उभारीत आहे त्यात पोलिसांसाठी विशेष तरतूद करावी. त्यासाठी धोरणामध्ये त्याचा समावेश केला जावा, अशी सूचनाही श्री.शिंदे यांनी यावेळी केली.
गृह बांधणी प्रकल्पातील बांधकामाचा दर्जा अधिक गुणवत्तापूर्ण कसा राहील त्याचबरोबर असे गृह प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यासाठी सिडकोने विशेष काळजी घेतली पाहिजे. समाजातील ज्या घटकांचे उत्पन्न मर्यादित आहे त्यांना प्रधानमंत्री आवास  योजनेतून घर घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज दिले पाहिजे, असे आवाहन श्री.शिंदे यांनी केले. 
हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना साहाय्यभूत ठरते. केवळ उत्पन्न मर्यादा, मासिक वेतन नसणे, अशा गटांतील तसेच छोट्या छोट्या व्यवसायावर आधारित असलेल्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज दिले तर त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे, श्री.शिंदे यांनी सांगितले.
यावेळी एनएमआरडीए, सिडको यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा नगरविकासमंत्र्यांनी घेतला. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्त शितल तेली-उगले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies