Type Here to Get Search Results !

पाडळी येथे पापड, लोणचे, मसाला पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली, पंचायत समिती शिराळा व बँक ऑफ इंडिया स्टार सांगली आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिराळा तालुक्यातील पाडळी येथे 10 दिवसांचा पापड, लोणचे व मसाला पावडर तयार करण्याच्या प्रशिक्षण सत्राचा समारोप झाला. यावेळी आरसेटी संचालक एन. एम. पठाण, सरपंच सत्यवान पाटील, उपसरपंच महादेव पाटील, ग्रामसेवक आनंदा पवार, जिल्हा परिषद शाळा पाडळीचे शिक्षक महादेव देसाई, ट्रेनर जयश्री कुंभार यांच्याहस्ते बक्षिस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देवून प्रशिक्षणाची स्तुती केली. तसेच अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील विकासाला नक्कीच चालना मिळणार असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. 
ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य वृध्दीचे तसेच एक कुशल उद्योजक बनवण्यासाठी पापड, लोणचे व मसाला पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. महिलांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आरसेटी मार्फत उद्योजकता जाणीव जागृती अभियान घेण्यात आले. यामध्ये पाडळीतील महिलांनी पापड, लोणचे व मसाला पावडर तयार करणे या प्रशिक्षणाची निवड केल्याने आरसेटी मार्फत इच्छुक व या व्यवसायासाठी पात्र असणाऱ्या महिलांना पापड, लोणचे व मसाला पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणार्थीमध्ये आत्मविश्वास वाढावा, त्यांना प्रेरणा मिळावी तसेच एका कुशल उद्योजकाकडे कोणत्या सक्षमता असल्या पहिजेत, बँकेमध्ये व्यवहार कसे केले पाहिजेत, प्रकल्प अहवाल कसा तयार केला पाहिजे, व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी कशा प्रकारे सोडविल्या पाहिजेत याविषयी प्रशिक्षणामध्ये सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 
प्रास्ताविक आरसेटी संचालक एन. एम. पठाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रशिक्षक प्रविण पाटील व प्रदिप साळुंखे यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन रविंद्र भोसले यांनी पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies