प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे : मास्तोळी कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 4, 2019

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे : मास्तोळी कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक.

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन 2019- 20 च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात रब्बी ज्वारी (बागायत), रब्बी ज्वारी (जिरायत), गहू (बागायत) व हरभरा या पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळ/मंडळ गट स्तरावर व उन्हाळी भुईमुग तालुकागट स्तरावर भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेत गहू, रब्बी ज्वारी, हरभरा पिकांसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागाची अंतिम मुदत दिनांक 31 डिसेंबर 2019 आहे. तसेच उन्हाळी भुईमुगसाठी सहभागाची अंतिम मुदत दिनांक 01 एप्रिल 2019 अशी आहे. पिक विमा योजनेच्या माध्यमातून कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. 
या योजनेमध्ये नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषि पत पुरवठ्यात सातत्य राखणे ही या योजनेची वैशिष्ठे आहेत. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेत खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत.
 या योजनेंतर्गत सर्व पिकासाठी जोखिममस्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. विमा संरक्षित रक्कम ही सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पिक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या पिक कर्ज दर विचारात घेवून निश्चित करण्यात येते. अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पन्न आलेल्या पाच वर्षाची सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखिममस्तर विचारात घेऊन निश्चित करण्यात आला आहे. या रब्बी हंगामातील सरासरी पिक उत्पादकतेची परिगणना करण्यासाठी अधिसूचित पिकासाठी निर्धारित केलेल्या विमा क्षेत्रात नियोजित पीक कापणी प्रयोगांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, सीएससी केंद्रामार्फत, विमा नियामक आणि प्राधिकरण संस्थेच्या प्रतिनिधी मार्फत व शेतकरी स्वतः ऑनलाईनद्वारे अर्ज भरून सहभागी होऊ शकतात. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा अर्जासोबत, आधार कार्ड/ आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, बँक बचत खात्याचे पासबुक, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांनी करारनामासह/ सहमती पत्र, पीक पेरणी दाखला किंवा स्वयं पेरणी घोषणापत्र इत्यादी कागदपत्रासह प्रस्ताव विहित मुदतीत सादर करून प्रत्यक्ष इलेक्ट्रोनिक स्वाक्षांकन करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या मंडळ, तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. मास्तोळी यांनी केले आहे.
पीकनिहाय विमा रक्कम व विमा हप्ता रक्कम  (हे.)
गहू बागायत - ३० हजार रूपये (४५० रूपये),
ज्वारी बागायत – २५ हजार रूपये (३७५ रूपये)
 ज्वारी जिरायत – २० हजार रूपये (३०० रूपये), 
हरभरा - २० हजार रूपये (३०० रूपये)
उन्हाळी भुईमूग – ३६ हजार रूपये (५४० रूपये).

No comments:

Post a Comment

Advertise