विकासाची चर्चा अन दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करा: आ. सातपुते. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 23, 2019

विकासाची चर्चा अन दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करा: आ. सातपुते.माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : सध्या मोठ्या प्रमाणात शेतीत पीक आहे. विद्युत रोहित्र जळल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पीक जळत आहे. विद्युत विभागातील अधिकऱ्यांना सांगूनही डीपी दुरुस्ती तातडीने होत नाही. त्यामुळे पाणी असूनही डोळ्यादेखत पीक जळताना शेतकऱ्यांना पाहावं लागत आहे. त्यामुळे या विषयावर तातडीने मार्ग काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी हिवाळी अधिवेशनात माळशिरसचे आम. रामभाऊ सातपुते यांनी केली.  सभागृहात कणखरपणे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करून देत गरिबांचे सरकार आहे तर शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याची मागणी केली.

सरकार सत्तेवर आले मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय पूर्ण होत नाही. ज्यांनी सभागृहात भरघोस मतांनी पाठवले ती जनता सातत्याने ७/१२  कोरा कधी होणार याची विचारणा करत आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाईसुद्धा अजून मिळाली नाही. यावर कधी कार्यवाही होणार असा सवालही आमदार सातपुते यांनी उपस्थित केला. तसेच माळशिरस आणि अकलूज परिसरासह ग्रामीण भागात एस.टी.ची दुरावस्था मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागात विद्यार्थी, नागरिक आणि सामान्य माणसांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होते याकडेही लक्ष वेधले. यासोबतच मतदारसंघातील कृष्णा-भीमा स्थिरीकरण आणि इतर विकासाच्या कामांवर सरकारने काम करून दाखवावं अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.


No comments:

Post a Comment

Advertise