Type Here to Get Search Results !

त्या वेळीच लोक रस्त्यावर उतरले असते तर नागरिकत्व सुधारणा कायदा झाला नसता. - ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर .

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पुणे प्रतिनिधी : नागरिकत्व सुधारणा कायदा झाला आहे. केंद्र  सरकारने एन आर सी प्रक्रिया सुध्दा राबविण्याची तयारी केली होती. मात्र या कायद्या विरोधात देशातील संविधान मानणारे सर्व जाती धर्मातील लोक रस्त्यावर उतरले, सरकार हादरले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत की, एन आर सी आणण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. हा देशभरातील तरुणाईच्या उस्फुर्त आंदोलनांचा विजय आहे. तुर्तास तरी सरकार आता त्याबद्दल घाई करील असे वाटत नाही. अर्थात या सरकारवर विश्वास ठेवून निर्धास्त रहाणे चुक ठरेल. मात्र दिल्लीत जंतर मंतरवर संविधान जाळले तेव्हाच असे तीव्र आंदोलन झाले असते तर कदाचित नागरिकत्व सुधारणा कायदाही झाला नसता, असे प्रतिपादन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी पुणे येथे केले. संविधानिक मूल्यांची रुजवात हीच प्रगत भारताची वहीवाट आहे असेही ते म्हणाले.
अभ्यासिका विद्यार्थी समितीच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त शामसुंदर महाराज यांच्या संविधान जागर प्रवचनाचे आयोजन केले होते. एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनचे विश्वस्त सचिव तथा संविधान अभ्यासक सुभाष वारे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ओंकार मोरे यांनी केले,  तर आभार प्रदर्शन अरिहंत मलकापुरे आणि सूत्रसंचालन अक्षय राऊत यांनी केले. यावेळी बोलताना शामसुंदर महाराज सोन्नर पुढे म्हणाले की, संविधानाला धक्के देऊन लोकांच्या मानसिकतेचा अंदाज घेण्याचे प्रकार गेल्या दोन तीन वर्षांपासून सुरू होते. संविधानापेक्षा मनू स्मृती श्रेष्ठ आहे, असे संभाजी भिडे यांनी केलेले विधान, तसेच दिल्लीत संविधान जाळण्याची झालेली घटना, हा समाज मनाचा अंदाज घेण्याचाच प्रकार होता. अशा प्रवृत्ती विरोधात त्याच वेळी लोक रस्त्यावर उतरले असते तर धर्मनिरपेक्ष देशात धर्मावर आधारित कायदा करण्याचे धाडस सरकारने केले नसते.  नागरिकत्व सुधारणा कायदा सुद्धा एन आर सी लादण्यापूर्वीची टेस्टच आहे. एन आर सी होणारच, असे अमित शहा यांनी संसदेत सांगितले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात लोक रस्त्यावर आले नसते तर ती प्रक्रिया सुद्धा लगेच काही दिवसांत सुरु झाली असती. मात्र थोडं उशीरा का होईना, लोकांनी संविधानाला जपणारी भूमिका घेतली. त्यामुळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एन आर सी बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे संसदेत सांगावे लागते. हा आंदोलनाचा विजय आहे, असेही शामसुंदर महाराज म्हणाले.
वारकरी संतांनी या महाराष्ट्रात समताधिष्ठित समाज निर्मितीचा पाया घातला. भक्ती पंथ सोपा केला. "कर्म हीच भक्ती" हा विचार त्यांनी समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला. संत सावता माळी यांचा कांदा मूळा भाजी l अवघी विठाई माझी ll हा अभंग कर्म हीच भक्ती या शिकवणुकीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे, असे सुभाष वारे म्हणाले. देव आणि भक्त यांच्यामधील शोषणकारी कर्मकांड आणि त्यावर जगणारी पुरोहितशाही संत परंपरेने नाकारली.  संविधानातील मूल्य आणि वारकरी संतांचे विचार परस्पर पूरक आहेत. हे दोन्ही विचार हातात हात घालून समाजात रुजवले पाहिजेत, यासाठी शामसुंदर महाराज करीत असलेले प्रयत्न खूप मोलाचे आहेत अशा शब्दात वारे यांनी सोन्नर महाराज यांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies