माणकीच्या खंडोबा यात्रेस सोमवार पासून सुरुवात . - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, December 1, 2019

माणकीच्या खंडोबा यात्रेस सोमवार पासून सुरुवात .

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : माणकी ता .माळशिरस येथील श्री खंडोबा (सट) यात्रेस सोमवार पासून प्रारंभ होत आहे. चंपाशिष्टी निमित्त हि यात्रा माणकी गावामध्ये भरविण्यात येते. सालाबाद प्रमाणे यात्रा भरविण्याचे हे ७ वे वर्ष आहे. यात्रेच्या निमित्ताने खंडोबा मंदिराचे बांधकाम, सभा मंडप, शिखर, डिकमल आदीची बांधकाम पूर्ण करण्यात आले असून संपूर्ण मंदिर, सभामंडप, शिखर यांना आकर्षक  रंग रंगोटी करून सुशोभित करण्यात आले आहे. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आल्याने विद्युत रोषणाईने मंदिर उजाळून निघाणार आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती नसल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून गावाबाहेर असणारे ग्रामस्थ यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये येत आहेत. 
यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये धार्मिक कार्यक्रमा बरोबर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ८ वा.३० मिनिटाने श्रीच्या पालखीची गावामधून मिरवणुक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता देवास पुरण पोळीच्या नैवेद्यचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११ ते १२ यावेळेमध्ये ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे लहान वयोगटातील मुलांच्या खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. यानंतर दुपारी १२ ते १ यावेळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील मुलांच्या संगीत खुर्ची व लिंबू  शर्यत स्पर्धा होणार आहे. तर दुपारी १ ते २ यावेळेमध्ये सदाशिवराव माने विद्यालयातील मुलासाठी डोळे बांधून मडके फोडणे हि स्पर्धा होणार आहे. दुपारी ३ वाजता निकाली कुस्ती स्पर्धा सुरु होणार आहेत.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी १ वाजल्यापासून गजीढोल स्पर्धा असून यामध्ये डोंबाळवाडी, तरंगफळ, भांब, उघडेवाडी, माणकी या गावातील गंजी ढोल संघ सहभागी होणार आहेत. तर रात्री ९ वाजता विनोद सम्राट अंकुश शिंदे वाघेमंडळ पार्टी तरंगफळ यांचा जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात्रा कालावधी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे व भाविक भक्ताने दर्शन सोहळयाचा लाभ घेण्याचे आवाहन खंडोबा यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्त माणकी यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise