Type Here to Get Search Results !

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना


माणदेश एक्सप्रेस न्युज 

मुंबई : देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील.  मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देश-विदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल.  यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) विकसित करावे, असे त्यांनी सांगितले. 
शहरातील पर्यटनाला व्यापक चालना देण्यासाठी शहरात सी वर्ल्ड, टुरिझम स्ट्रीट, फ्लेमिंगो टुरिझम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाईट सफारी आदी सुरु करता येईल का याबाबतही यावेळी चर्चा झाली. शहराला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. त्याचा पर्यटनवृद्धीसाठी कसा वापर करता येईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. शहरातील कान्हेरी गुंफा, जोगेश्वरी गुंफा, एलिफंटा लेणी आदींच्या क्षेत्राचा विकास करण्यात यावा. तसेच राज्यात एखादे योग्य ठिकाण शोधून तिथे आताच्या युगातील लेणी विकसित करता येतील यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मादाम तुसाद संग्रहालयाच्या धर्तीवर शहरात एखादे संग्रहालय सुरु करण्यात यावे. पण त्यात वेगवेगळे पुतळे ठेवण्यापेक्षा एखादी संकल्पना निश्चित करुन ‘थीम बेस्ड’ संग्रहालय उभारण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 
यावेळी सिंधुदुर्गमधील सबमरिन पर्यटन प्रकल्पाचाही त्यांनी आढावा घेतला. सिंधुदुर्ग विमानतळ आणि या प्रकल्पाला दर्जेदार रस्त्यांची जोड देण्यात यावी. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा राखून या प्रकल्पाचा विकास करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील नाल्याचे पाणी बंद करुन त्याची स्वच्छता राखण्यात यावी. या सरोवराच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies