जयसिंगपूर येथे शेतमजूर परिषदेचे आयोजन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 26, 2019

जयसिंगपूर येथे शेतमजूर परिषदेचे आयोजन.

माणदेश एक्सप्रेस न्युज
जयसिंगपूर  प्रतिनिधी : स्वराज अभियान आणि महाराष्ट्रातील अन्य समविचारी संस्था संघटना यांच्यावतीने जयसिंगपूर येथे शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०१९ रोजी शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर शेतमजूर परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब नदाफ असतील अशी माहिती या परिषदेचे निमंत्रक ललित बाबर यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले कि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून काही भागात पूर परिस्थिती तर काही भागात दुष्काळाची परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. यामध्ये शेतकरी,शेतमजूर, व्यापारी यांच्या बरोबरच   मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची आणि नैसर्गिक साधन संपत्तीची हानी झाली  आहे. शासनाच्या पातळीवर शेतीच्या नुकसानीची भरपाई काही प्रमाणात मिळत आहे तसेच त्यांना उभे करण्यासाठी कर्जमाफी   केली जात आहे मात्र शेतमजूर व कष्टकऱ्यांना काहीच मिळत नाही . यावर्षी शासनाने शेतकऱ्यांसाठी  कर्जमाफी केली आहे  तसेच शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येत आहे. मात्र शेतमजूर आणि कष्टकरी यांच्यासाठी शासनाच्या वतीने कोणत्या  घोषणा  केल्या जात नाहीत अथवा त्यांच्या विकासाच्या योजना आणल्या जात नाहीत.  दुष्काळ आणि पूर परिस्थितीमध्ये शेतमजुरांना रोजगार मिळत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली जात आहे आणि याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावर, आरोग्यावर, मुलांच्या शिक्षणावर झाल्याचे दिसून येत आहे. दुष्काळ आणि पूर परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठीची तरतूद शासन आणि प्रशासन पातळीवर आहे तसेच अनेक संस्था संघटना आणि व्यक्ती मदत करण्यासाठी पुढे येत असतात मात्र शेतमजुरांच्या प्रश्नांवरती राजकीय पक्ष, शेतकरी संघटना व शासन यांच्याकडून त्यांच्या  आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी प्रयत्न केले गेल्याचे दिसून येत नाही. शेतमजुरांचा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये मोठा  वाटा आहे. आपत्ती आणि आपत्ती नंतरच्या काळात शेतमजुरांचे अनेक प्रश्न समोर येत  आहेत. अनेक शेतमजुरांना शासनाच्या लाभांपासून वंचित राहावे लागत आहे तसेच अस्तित्वात असलेल्या योजनांचा लाभ मिळत  नाही. या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्यांचे प्रश्न शासनासमोर आणण्याच्या हेतूने या शेतमजूर परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या परिषदेच्या माध्यमातून खालील पुढील  चर्चा केली जाणार आहे. शेतकरी  व व्यापारी यांच्या प्रमाणे शेतमजूर व कष्टकऱ्याना  रोहयो योजनेच्या दराप्रमाणे २०० दिवसाचे ४१००० रु ची मदत देण्यात यावी,  पूरग्रस्त भागातील पूर्णत: व अंशत: पडलेल्या घरांच्या बांधणीसाठी कर्नाटक सरकार प्रमाणे ५  लाख रु ची तरतूद करावी, एकल महिला  (विधवा,  परितक्त्या व अन्य)  अपंग व  वृद्ध यांना मिळणाऱ्या  पेन्शन मध्ये सरसकट  वाढ करून ती  ४००० रु करण्यात  यावी तसेच पेन्शन योजनेतील  मुलांच्या वयाची अट रद्द करण्यात यावी आणि वृद्धापकाळ पेन्शन योजनेसाठी वयाची अट   ५५ वर्षा पर्यंत शिथिल  करावी, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत शेतमजुरांचा  समावेश करण्यात यावा, प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी वाढवून तो ३ लाख रु पर्यंत करावा व भूमिहीन कुटुंबाना घर बांधणीसाठी १  गुंटा जागा द्यावी. या परिषदेत सुभाष लोमटे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, सुरेश सासणे, अॅड. वर्षा देशपांडे,  प्रा. ओमप्रकाश कलमे, इस्माईल समडोळे, आबा सागर, किरण कांबळे, प्रभा यादव, मिनाज जमादार यांच्यासह  अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहणार असून सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतमजूर- कष्टकरी यांनी मोठ्या संख्येने या परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.No comments:

Post a Comment

Advertise