Type Here to Get Search Results !

दिनांक 1 डिसेंबर जागतिक एडस् दिन.

एड्स – तुमची स्थिती माहीत करून घ्या !
एचआयव्ही म्हणजे मानवी रोगप्रतिकार शक्तीचा ऱ्हास करणारा विषाणू. एड्स हा मानवी रोगप्रतिकार शक्तीचा ऱ्हास झाल्याने दिसणाऱ्या रोग लक्षणांचा समूह आहे. निरोधचा वापर न करता केलेले लैगिंक संबध, एचआयव्ही संसर्गित रक्त किंवा रक्तघटक इतर व्यक्तीस चढवल्याने, एचआयव्ही संसर्गित दुषित सुया व सिरींज वापरल्याने, एचआयव्ही संसर्गित गर्भवती मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला ही एचआयव्ही संसर्ग होण्याचे मार्ग आहेत. इतर कोणत्याही कारणाने एचआयव्हीची लागण होत नसून भांडी, कपडे किंवा शौचालयाचा वापर केल्याने, एकत्र राहिल्याने किंवा जेवण केल्याने एच.आय.व्ही. होत नाही. जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती सांगली मार्फत दि. १ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ८.३० वाजता एच.आय.व्ही. एड्स जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली येथे करण्यात आले आहे. या वर्षाचे घोषवाक्य तुमची स्थिती माहित करून घ्या हे आहे. एच.आय.व्ही. / एड्स प्रादुर्भाव व प्रतिबंध या विषयाची जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
निरोध
निरोध हा जसा कुंटुंबनियोजन किंवा नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी उपयोगी पडतो. तसाच एच.आय.व्ही व इतर लैगिंक संबंधाद्वारे पसरणारे आजार थांबविण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. एच.आय.व्ही. ची लागण होऊ नये यासाठी निरोध जसा उपयोगी पडतो तसाच जर पती पत्नी एचआयव्ही संसर्गित जरी असेल तरी त्यांनी निरोधचा वापर करणे गरजेचे आहे. कारण यामुळे औषधोपचारास प्रतिकार शक्ती निर्माण झालेला विषाणू एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जात नाही. त्यामुळे एचआयव्ही संसर्गित व्यक्तीस सुरू केलेली एआरटी औषधोपचार पध्दती यशस्वीपणे लागू पडते व या विषाणूस आपण नियंत्रणात ठेवू शकतो.
ट्रीट ऑल
सर्व एच.आय.व्ही संसर्गित रूग्णांना एआरटी औषधोपचार दिला जातो. सुरवातीच्या काळात ज्या एच.आय.व्ही संसर्गित रुग्णांना CD4 200 पेक्षा कमी असेल त्या रूग्णांना एआरटी औषधोपचार दिला जात होता, त्यानंतर शासनाने CD4 350 पेक्षा कमी असणाऱ्या रूग्णांना एआरटी औषधोपचार चालु करण्याचा निकष केला व नतंर CD4 500 चा निकष केला. परंतू नवीन अभ्यासाअंती निर्दशनास आले आहे. की जरी रुग्णांचे CD4 जास्त असला व उपचार सुरू केले तर एच.आय.व्ही चे शरीरावरील दुषपरिणाम कमी होतात. रूग्णांचे जीवनमान उंचावते व संधीसाधु आजारास बळी पडत नाही. दि. 05 मे 2019 पासून Treat All Policy अंतर्गत सर्वच एचआयव्ही संसर्गित रुग्णांना मोफत एआरटी औषधोपचार सुरू करण्यात येत आहेत.
एचआयव्ही संसर्गित पालकांच्याकडून बाळाला होणारा संसर्ग
एच. आय.व्ही एड्स संसर्गाचे चार मार्ग आहेत. त्यापैकी एक म्हणजे पालकांकडून बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग. गरोदर मातेकडून बाळाला होणारा संसर्ग टाळण्यासाठी सर्व गरोदर स्त्रियांची HIV/AIDS या आजाराची तपासणी केली जाते. बाळाची आई एच.आय.व्ही संसर्गित असेल तर तिचे समुपदेशन करून तिला एआरटी औषध सुरू केला जातो. त्याचबरोबर तिच्या कुटुंबाचे समुपदेशन करून तपासणी केली जाते. तिची प्रसुती सरकारी दवाखान्यात केली जाते. तसेच प्रसुती झाल्यावर बाळाची काळजी, संगोपण, तसेच स्थनपान किंवा पर्यायी आहार याबाबत समुपदेशन केले जाते व मुलाला एच.आय.व्ही. होण्यापासून सर्व प्रकारचे समुपदेशन व उपचार दिले जातात. त्यानंतर बाळाची ITCT सेंटरला 6 आठवडे, 6 महिने, 12 महिन्यांमध्ये एचआयव्ही टेस्ट DNA-PCR द्वारे नारी संशोधन केंद्र पुणे च्या माध्यमातून केली जाते. तसेच 18 महिन्यांची RAPID टेस्ट ITCT सेंटरला केली जाते.  समुपदेशकांनी केलेल्या समुपदेशनाचे पालकांकडून योग्य पालन झाल्यास पालकांपासून बालकास होणारा एचआयव्ही संसर्ग योग्य ओषधोपचाव्दारे पूर्णपणे रोखता येऊ शकतो. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी संलग्नित पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे करण्यात आलेल्या PPTCT केंद्र हा शासनाचा उल्लेखनिय कार्यक्रम आहे. कारण या केंद्रामध्ये सन 2019-20 या आर्थिक वर्षांमध्ये एकूण 67 बालके तपासण्यात आली त्या पैकी 64 बालके आजारापासून मुक्त निदर्शनास आली आणि उरलेल्या 3 बालकांना पुढील औषधोपचारासाठी एआरटी विभागाशी संलग्नित करण्यात आली.
1097 साधन हेल्पलाईन नंबर
मोबाईल किंवा लँडलाईन फोन वरून 1097 या  साधन हेल्पलाइन नंबर द्वारे एचआयव्ही/एड्स व गुप्तरोग आजारा बाबत 24 तास मोफत व  कोणत्याही भाषेमध्ये माहिती घेऊ शकतो.
उद्दिष्ट व संकल्पना 
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली द्वारे सन 2020 अखेर 90:90:90 चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या तीन 90 पैकी प्रथम 90 हा जे लोक एचआयव्ही संसर्गित आहेत त्यापैकी किमान 90 टक्के लोकांना ज्यांना एचआयव्हीची  लागण झालेली आहे याची माहिती त्यांना असणे आवश्यक आहे. जेणेकरून ते स्वतःवर उपचार घेतील व त्यांच्यापासून इतरांना एचआयव्ही चा  प्रसार होण्यास प्रतिबंध करतील. व्दितीय 90 हा ज्या लोकांना त्यांची एचआयव्ही स्थिती समजली आहे. त्यापैकी किमान 90 टक्के व्यक्ती या एआरटी उपचारावरती येतील.  तृतीय 90 हा जे लोक एआरटी उपचारावरती आलेत त्यापैकी किमान 90 टक्के व्यक्तींना योग्य उपचार मिळून एचआयव्ही या विषाणुंची संख्या शरीरामध्ये नियंत्रणात राहून स्वस्थ आयुष्य जगतील. 
90:90:90 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी Know Your Status ही यावर्षीची संकल्पणा आहे. याव्दारे सर्वच लोकांनी तपासणीव्दारे स्वत:ची एचआयव्ही स्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. परंतू यामध्ये प्राधान्यक्रमाणे देहविक्री करणाऱ्या स्त्रिया, समलिंगी पुरूष व त्यांचे ग्राहक, ट्रक चालक-वाहक, स्थलांतरित कामगार तसेच एकापेक्षा अधिक जोडीदार असणाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. याचबरोबर ज्या व्यक्तींचा जोडीदार एचआयव्ही संसर्गित आहे. अशा व्यक्ती किंवा ज्यांचे आई वडिल एचआयव्ही संसर्गीत आहेत अशा मुलांची तपासणी होणे क्रमप्राप्त आहे. यामुळे ज्या लोकांना या तपासणीव्दारे एचआयव्ही संसर्ग झाल्याचे निर्दशनास येईल त्यांनाही आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी मोफत औषधोपचार एआरटी केंद्राव्दारे दिला जाईल व यामुळे त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारून जीवनमान उंचावेल.
एआरटी ADHERANCE 
एआरटी Adherance म्हणजे एआरटी औषधातील सातत्य. एचआयव्ही संसर्ग किंवा एड्स हा आजार उच्च रक्तदाब व मधुमेह या आजारा सारखा नियंत्रणात ठेवण्यासारखा आजार आहे. हा सध्याच्या परिस्थिती मध्ये पुर्ण बरा होणारा आजार नाही. त्यामुळे एचआयव्ही संसर्गित व्यक्तीला आयुष्यभर औषधोपचार घ्यावा लागतो. परंतु यामध्ये काही रूग्ण सातत्य ठेवत नाहीत. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह या आजारामध्ये रूग्णाने एक वेळ जरी औषधे घेतली नाहीत तरी काही तरी त्रास या रूग्णांना होतो परंतु एआरटीची औषधे एक किंवा दोन दिवस नाही घेतली तरी तात्काळ कोणताच त्रास एचआयव्ही संसर्गित रूग्णास जाणवत नाही. परंतु औषधे चुकल्याने शरीरातील विषाणु एआरटी औषधास प्रतिकार करण्यास सज्ज होतो किंवा एआरटी औषधास दाद न देणारा बनतो. त्यामुळे या रूग्णांना अधिक ताकतीची सेकंड लाइन किंवा थर्ड लाइनची औषधे द्यावी लागतात जी रूग्णांना अधिक त्रास दायक असतात. त्यामुळे रूग्णांनी सातत्य ठेवल्यास भविष्यात होणार त्रास टाळू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies