Type Here to Get Search Results !

आटपाडीत अवतरली आळंदी; ज्ञानेश्वरी पारायणाचा सांगता सोहळा निमित्त भव्य दिंडी.

आटपाडी/प्रतिनिधी :  आटपाडीत आळंदी अवतरली असा भास काल  झाला. ज्ञानेश्वर माऊलींचा जल्लोषाने आटपाडी शहर दुमदुमून गेले. ज्ञानेश्वरी माऊली भव्य पालखी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज व सद्गुरु सेवागिरी महाराज यांच्यावतीने काल ज्ञानेश्वरी पारायणाचा सांगता समारंभ झाला. पारायणाचे 26 वे वर्ष आहे. प्रा विष्णू जाधव महाराज यांच्या वतीने दरवर्षी दिवाळीनंतर पारायणाचे आयोजन केले जाते. पारायण निमित्त दिघंची रस्त्यावरील वैकुंठ मठापासून पालखी दिंडी सोहळा काढण्यात आला. या पालखी सोहळा मिरवणूक मध्ये गायी, रेडा, बैल, घोडा, उंटस्वार, हत्ती होते. 
खानापूरच्या वेणूताई चव्हाण विद्यालयाच्या मुलींचे झांजपथक, मसुचीवाडीतील नाद ब्रह्म ढोल पथक, कुंभोज येथील जय शिवराय लेझीम पथक, विठ्ठलापुरातील जालिंदर पाटील सनई पथक, बनगरवाडी आदर्श विद्यालयाचे झांजपथक, आटपाडीचे हलगी पथक, पुसेगावचा शशिकांत बँड आधी वाद्य मिरवणुकीच्या अग्रभागी होते.
घोडेस्वार, उंट, हत्ती स्वार व देवाच्या प्रतिमा नगारा टाळ-मृदंग माऊलीचा जल्लोष करीत चौका-चौकात रिंगण आयोजित करून फेर धरणाऱ्या महिला भाविक यांनी दिंडी सोहळ्यात रंगत आणली. पालखी मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. पालखी सोहळ्याचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले. दर्शन घेतले. जाधव महाराजमठ, आण्णाभाऊ साठे नगर चौक, बाजार पटांगण, सांगोला कॉर्नर, एसटी बस स्थानक मार्गे कल्लेश्वर मंदिर, बाजार पटांगण ते पुन्हा जाधव महाराज मठ अशी दिंडी नेण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies