ग्राहकांच्या अधिकाराबाबत ग्राहक संरक्षण परिषदेने जनजागृती करावी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 23, 2019

ग्राहकांच्या अधिकाराबाबत ग्राहक संरक्षण परिषदेने जनजागृती करावी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : ग्राहक म्हणून काय अधिकार आहेत  याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ग्राहकांनाही त्यांची कर्तव्ये व जबाबदारीची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यायाबद्दल दाद कोठे मागावी याबाबत ग्राहकांना माहिती असणे आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण परिषदेने ग्राहकांचे सर्व अधिकार प्रबोधनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जागो ग्राहक जागो मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील सर्व शासकीय व अशासकीय सदस्यांच्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेस अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष श्री. दाते, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, वैधमापनशास्त्र सहाय्यक नियंत्रक श्री. येवलेकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. मेहता, श्री. वसंत आपटे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील, भास्कर मोहिते यांच्यासह समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले यांनी सर्वांनी मी ही एक ग्राहक आहे म्हणून समितीत काम करावे असे आवाहन करून प्रत्येक शनिवारी पोलीस विभागामार्फत तक्रार निवारण दिन म्हणून लोकांच्या आलेल्या तक्रारीचे निराकरण केले जात असल्याचे सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अन्नसुरक्षा कायदा व ई-पॉस मशीनबाबत सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी कृषि क्षेत्रातील शासनाच्या योजनांबाबत माहिती दिली. ग्राहकांचे लोकशाहीमधील स्थान या विषयावर वसंत आपटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सहायक नियंत्रक श्री. येवलेकर यांनी थेट विक्री करणाऱ्या कंपन्यांचे कामकाज व त्यांच्याविरूध्द येणाऱ्या तक्रारींचे निराकरण याबाबत माहिती दिली. तसेच वैधमापन शास्त्र यंत्रणेचे कार्य व यंत्रणेचे संगणकीकरण बाबतची माहिती दिली. सायबर क्राईमचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांनी साईबर क्राईमचे स्वरूप, घ्यावयाची दक्षता व तक्रारींचे निवारण या विषयी सविस्तर विवेचन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी परिवहन विभाग, खाजगी प्रवासी वाहतूक, ट्रॅव्हल्स, रिक्षा, स्कूल बस, रस्ता सुरक्षा समिती कामकाज, व पीक सीझनमधील खाजगी प्रवासी वाहतुकीचे दर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष श्री. दाते यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार राज्य व जिल्हा  मंचाचे कामकाज, न्यायदान प्रक्रियेमध्ये ग्राहकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण, रेरा कायदा विषयक मार्गदर्शन केले. महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. मेहता यांनी वीज क्षेत्रातील शासनाच्या योजना, कृषि क्षेत्राशी संबंधित योजना, विद्युत अधिनियमानुसार एसओपी व विद्युत ग्राहक न्यायमंच, विद्युत ग्राहकांचे अधिकार  व तक्रार असल्यास कोठे करावी याबाबत सविस्तर माहिती दिली. भास्कर मोहिते यांनी वस्तू व सेवा खरेदीमध्ये ग्राहकांची होणारी फसवणूक त्या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता, ग्राहकांचे विविध हक्क या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करून कार्यशाळेच्या माध्यमातून ग्राहकांचे हक्क, कायदे याचे ज्ञान घेऊन त्याचा वापर समाजासाठी करावा. प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे त्याचबरोबर आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्याही पार पाडल्या पाहिजेत. नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा या कार्यशाळेचा गाभा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी दिप प्रज्वलन व ग्राहकतिर्थ बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. आभार जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise