Type Here to Get Search Results !

स्वच्छता हा एक संस्कार : प्रधान सचिव विकास खारगे; गिरगाव चौपाटी समुद्र किनारा स्वच्छता अभियानाचा समारोप.



माणदेश एक्सप्रेस न्युज 
मुंबई : स्वच्छता हा शिकविण्याचा किंवा समजवण्याचा विषय नसून तो एक संस्कार आहे, तो सर्वांनी अंगिकारावा. यासाठी आठवड्याचे किमान दोन तास द्यावे, असे आवाहन वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले. गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा समारोप करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एन.वासुदेवन, विरेंद्र तिवारी, ठाणे मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे तसेच सामाजिक वनीकरण शाखेतील इतर अधिकारी उपस्थित होते. 
पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत  दि. ११ ते १७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत गिरगाव चौपाटी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्याचा समारोप आज वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केला.
यावेळी श्री.खारगे म्हणाले, स्वच्छतेचे हे अभियान मर्यादित न राहता ती चळवळ झाली पाहिजे. समुद्र किनाऱ्याची स्वच्छता ही जबाबदारी केवळ शासनाची नसून यात सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे. या अभियानात २ हजार स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला असून गिरगाव चौपाटीचा ६.४५ कि.मी. समुद्र किनारा स्वच्छ झाला आहे. 

जैव विविधता टिकवून ठेवणे ही काळाची गरज असून कांदळवन संवर्धनामुळे त्सुनामी, सायक्लॉन सारख्या आपत्तीपासून संरक्षण होते. या अभियानात सहभागी झालेल्या सामाजिक, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर एन.एस.एस, एन.सी.सीचे विद्यार्थी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय हरित सेनेचे सदस्य, सामाजिक वनीकरण शाखा आदींचे श्री.खारगे यांनी कौतुक केले.
श्री.त्यागी म्हणाले की, या अभियानाअंतर्गत गिरगाव, उरण, गणपतीपुळे आणि तारकर्ली असे चार समुद्र किनारे स्वच्छ करण्यात आले. या अभियानाअंतर्गत २८.३५ कि.मी. समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. या संपूर्ण अभियानात 6 हजार पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी सहभाग घेतला असून सुमारे ६३ टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वच्छतेवर आधारीत ‘लक्ष्मण रेषा’ हे पथनाट्य सादर करण्यात आले.  यावेळी या अभियानात सहभागी झालेल्या सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात आली.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies