Type Here to Get Search Results !

सावळज परिसरातील खरीप वाया


 माणदेश एक्सप्रेस न्यूज
प्रशांत केदार/सावळज : तासगाव तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात पहिल्यांदाच खरीप हंगाम पिके जोमाने उभी होती.ऑक्टोबर महिन्यात काढणीस आलेले खरीप पिके परतीच्या मान्सून पावसात सापडली.परतीच्या मान्सूनने वादळी वारे व विजेच्या कडकडाटसह हजेरी लावली.सावळज विभागातील 621 मिलीमीटर झालेल्या पावसाने खरीप पिकांची वाताहत केली.पंधरा दिवसाच्या दमदार पावसाने शेतकऱ्याच्या  हातातोंडाला आलेला खरिपाचा घास  हिरावून घेतला.बाजरी,ज्वारी,मका,भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची मोठी नासाडी झाली.त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया गेला आहे.
     तासगाव पूर्व भागात एक महिना संततधार लागून होती.मोठा व सलगच्या संततधार पावसाने  खरीप पिकांच्या रानात गुडघाभर पाणी उभा राहीले. 
ज्वारी,मका,देशी व संकरित बाजरी,भुईमूग, सोयाबीन,अशी पिके काढणी योग्य झाली असताना पाऊस थांबेना.काही शेतकऱ्यांनी संकरित बाजरी व ज्वारी चिखलात जाऊन काढली.कोंदट व दमट हवामानामुळे बाजरीसमवेत ज्वारीची कणसेही काळी पडली.इतर उभी ज्वारी व बाजरी काळी पडून तिला कोंब फुटल्याने पीक हातून गेले.सतत ढगाळ,दमट वातावरणामुळे मक्यावर लष्करी अळीने हल्ला चढविला होता.त्यातून उरलीसुरली मका पाण्यात भिजून कुजली.सोयाबीन,भुईमूग,उडीद पिके पाण्यात सडून गेली.थोडंफार हाताला लागले अन्यथा बहुतांश प्रमाणात यंदाचा खरीप पावसाने बाद करून टाकला.त्यामुळे हाततोंडाला आलेले यंदाचे खरीप पीक वाया गेले.
         खरीप पिकापासून अन्नधान्य व जनावरांच्या चाऱ्याची निर्मिती होते.परंतु पावसाने अन्नधान्यसोबत वैरणही कुजून गेली.ज्वारी,बाजरी,मका पिकापासूनच जनावरांसाठी कडबा उपलब्ध होतो.परन्तु पिके पावसात व पाण्यात दीर्घकाळ उभी राहिल्याने कणसे व वैरण कुजून गेली.भुईमूग व सोयाबीन ही तेलउत्पादक पिके पाण्यात शोधण्याची वेळ आली.दोन्ही पिकांची पाने पिवळी पडून फळधारणा परिपक्कव झाली नाही.परिणामी यंदाच्या खरीप हंगाम पिकातून कसलेच उत्पन्न मिळण्याची चिन्हे नाहीत.अतिपर्जन्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.ना अन्नधान्य पदरात ना वैरण हाताशी काहीच हाताला नाही.खरिपातील कोणतेच पीक हातात न लागल्याची खंत शेतकऱ्यांत आहे.
          गेली अनेक वर्षे भागातील भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी सोडली होती.यंदा जूनमधील चांगल्या पावसामुळे खरीप पेरणी झाली.अधूनमधून कोसळणाऱ्या सरींनी खरिप पिकाला जीवनदान देत जोमाने अंतिम टप्प्यात आणले.परन्तु परिपक्कव झालेली पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात असताना पावसाने मात्र एक महिना पिच्छा  सोडला नाही.अतिपावसाने पिके कुजली.खरिपाचे धान्य व वैरण दोन्हीही वाया गेल्याने खरीप पिकावरील पेरणी,मशागत, काढणी पर्यंतचा खर्च वाया गेला आहे.भागात बागायती क्षेत्रासोबत खरीप पिकांच्या स्थितीची पंचनामे करण्याची मागणी आहे.सरकारने यांकडे गंभीर्याने पाहत ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत करण्याची गरज आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies