खरसुंडीत स्नेहमेळाव्यातून आठवणींना उजाळा; माजी विद्यार्थी-शिक्षकांकडून विद्यालयास आर्थिक मदत. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 22, 2019

खरसुंडीत स्नेहमेळाव्यातून आठवणींना उजाळा; माजी विद्यार्थी-शिक्षकांकडून विद्यालयास आर्थिक मदत.


माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/मनोज कांबळे: येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सिद्धनाथ विद्यालय व कला वाणिज्य आणि विज्ञान (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा पार पडला. १९६० च्या स्थापनेपासून आज अखेर विद्यालयातील सर्व बॅचचे माजी विद्यार्थी-शिक्षकांची या  मेळाव्यास उल्लेखनीय उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.  मुख्याध्यापक पुजारी. आर.डी, संस्थेचे दक्षिण विभाग सल्लागार विलास शिंदे, माजी मुख्याध्यापक पाटील.डी.बी, शिंदे.एस.जी, पाटील.एम.डी, श्री फडतरे, प्रा.कुंभार, सुतार.एन.डी, उत्तमराव निकम, गायकवाड.आर.आर, सज्जनराव भोसले प्रमुख उपस्थित होते. 
या सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन करताना प्रा. राजेंद्र मोरे म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याच्या प्रेरणेतून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. मुलांनी महात्मा फुले यांचे गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड साहित्य वाचून उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्मवीर अण्णांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भूमीची मशागत केली. यातूनच रयत शिक्षण संस्थेची पायाभरणी यशस्वी वाटचाल झाली. ग्रामीण भागात अनेक शाखांच्या माध्यमातून संस्था उभारली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाचे जाळे पसरले. त्यासाठी सर्व स्तरातून मदत मिळाली. पुढील काळातही रयत शिक्षण संस्था बदलत्या परिस्थितीनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कार्यरत राहील. नवीन विचार आणि कृती कार्यक्रम यातून शाळेचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्याकरता माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असेही ते म्हणाले.
रयत शिक्षण संस्थेने आम्हाला घडवले, विद्यालयातील शिक्षकांनी आम्हास बहुमोल मार्गदर्शन केले म्हणूनच आम्ही यशाची शिखरे गाठली. विविध क्षेत्रात यश संपादन केले. डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांसारख्या अनेक पदांवर काम करण्याची संधी विद्यालयातील शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळे मिळाली. ग्रामीण आणि दुष्काळी भागातील शिक्षण संस्था असतानाही एक एक मोहरा घडविण्याचे काम विद्यालयातील शिक्षकांनी केले. यापुढेही सामाजिक, व्यावसायिक व औद्योगिक त्याचबरोबर कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांची बौद्धिक जडणघडणीची परंपरा कायम ठेवून भावी पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी हे विद्यालय अनेक पैलू घडवेल असा ठाम विश्वास व्यक्त करत विद्यालय देईल ती जबाबदारी पूर्ण करू. विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असल्याचा शब्द माजी शिक्षक विद्यार्थ्यांनी संयोजकांना दिला.
कार्यक्रमास प्रा.नलवडे.व्ही.एस, दिगंबर  पोमधरणे, बादशहा इनामदार, शशिकांत देठे, गजानन सावकार  बाळासाहेब झंजे, सुर्यकांत पोरे, राहुल गुरव, मोहन राजमाने, विजय पुजारी, भारत पाटील, मुकुंद पाटील, किसन भांगे, गायकवाड सर, विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत विद्यमान शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माने व्ही. आर यांनी तर आभार माजी विद्यार्थी विनोद पुजारी यांनी मानले.
श्री.सिद्धनाथ विद्यालयासाठी कै.सिताराम बापू पुजारी, बळवंत पुजारी, सखाराम पाटील यांच्यासह खरसुंडी पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमींनी दिलेल्या योगदान व संघर्षातून विद्यालयाची निर्मिती झाली असल्याचे गौरवोद्गार माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी काढले. १९७२ च्या दुष्काळात ही प्रचंड कष्टाने शाळेची उभारणी सुरू होती. 
माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस भरघोस आर्थिक मदत 
श्री नाथ देव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, विद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पुजारी, गजानन पुजारी यांच्याकडून पेयजल टाकी बांधकामासाठी १,५०,००० तर माजी विद्यार्थी बालाजी सावकार, अर्जुन सावकार  २,५१,०००, सुनील मारुती गुरव वाझरकर १,००,०००, प्रभाकर केंगार, ५,०००, संजय कालिदास पोरे, ५,०००,  अजित शामराव पाटील ५,०००, यादव.पी.जे (लेखनिक) ५,०००, बेबीताई भीमराव गुरव ५,०००, रुक्मिणी गोरखनाथ पोमधरणे ५,००० रुपयांची विद्यालयास भरघोस आर्थिक मदत केली.
स्नेहमेळावा ठरला अविस्मरणीय क्षण
विद्यालयाच्या स्थापनेपासून सर्व बॅचचे विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना शाळेत गुरुजींनी दिलेली शिक्षा, मास्तरांनी हातवर दिलेली छडी, शाळेतली मजा-मस्ती अश्या सर्व आठवणींनी विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. सवंगड्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेतील ते दिवस पुन्हा येतील का असे सांगताना माजी त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यामुळे हा पाऊलखुणांचा स्नेहमेळावा विद्यार्थ्यांच्या आपुलकीचा, आनंदाचा, भेटीगाठीचा तसेच कलामय जीवनाचा 'अविस्मरणीय क्षण' ठरला.
आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस whatsapp group मध्ये join होण्यासाठी click करा.

No comments:

Post a Comment

Advertise