Type Here to Get Search Results !

अवैद्य मद्य निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्यास तक्रार नोंदवा: अधीक्षक किर्ती शेडगे


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : विधानसभा निवडणूक-2019 च्या निवडणुका भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये कोठेही अवैद्य मद्य निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्यास 8422001133 या व्हॉटस ॲप क्रमांक व टोल फ्री क्रमांक 18008333333 अथवा सांगली अधीक्षक कार्यालयाच्या 0233-2670876 या दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क सांगलीच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी केले आहे. 
अधीक्षक किर्ती शेडगे म्हणाल्या, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने इतर राज्यातील बेकायदेशीर मद्याची आयात थांबविण्याकरिता कर्नाटक सिमावर्ती भागांमध्ये 02 तात्पुरते सिमा तपासणी नाके मिरज तालुक्यातील म्हैशाळ व जत तालुक्यातील सिंदुर येथे उभारण्यात आले आहेत. मतदारांना प्रलोभन देण्याकरिता दारूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक, आयात, निर्यात, मळी, ताडी याची बेकादेशीर विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता तसेच ढाबे, रिसॉर्ट, हायवे लगतची हॉटेल, खानावळी येथे परवानगी शिवाय मद्याचे व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता 02 विशेष दक्षता पथके व 1 जिल्हा भरारी पथक संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे. 
आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तींचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडून दैनंदिन सखोल निरीक्षण केले जाणार आहे. जर कोणत्याही अनुज्ञप्तीमधून बेकायदेशीर/परराज्य निर्मित मद्याचा साठा करून त्याची विक्री करताना तसेच विना वाहतूक पास मद्यसाठा किंवा ठोक विक्रेत्यांकडून मद्य आणून बेकायदेशिररित्या साठा करत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरूध्द तात्काळ मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून गुन्हे नोंद केले जाणार आहेत. आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांना त्यांचे अनुज्ञप्तीकक्ष नियमानुसार विहीत वेळेत सुरू व बंद करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. विहीत वेळेपूर्वी अनुज्ञप्ती सुरू केल्यास किंवा विहीत वेळेनंतर चालू ठेवल्यास संबंधितांविरूध्द तात्काळ मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून गुन्हे नोंद केले जाणार आहेत. सर्व मद्य निर्माणी घटक, ठोक व किरकोळ विक्री ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असल्याचे अधीक्षक किर्ती शेडगे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies