Type Here to Get Search Results !

विधानसभा निवडणुकीत आटपाडीचाच आमदार होणार: अमरसिंह (बापू) देशमुख ; आठ दिवसात राजेवाडी तलावात उरमोडीचे पाणी येणार


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून आटपाडीचाच आमदार होईल असे मत सांगली जिल्हा परिषदेचे माजी  अध्यक्ष अमरसिंह (बापू) देशमुख यांनी व्यक्त केले. आटपाडी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. 
अमरसिंह (बापू) देशमुख म्हणाले, उरमोडीचे पाणी राजेवाडी तलावात सोडण्याचे आदेश कृष्णा खोरे विकास महामंडळचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यामुळे ८ दिवसात उरमोडीचे पाणी  राजेवाडी तलावात येईल असे ते म्हणाले. टेंभू योजनेत समावेश नसलेले आटपाडी तालुक्यातील अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. माणगंगा नदीला राजेवाडीचे पाणी सोडल्यास वंचित गावांना त्याचा लाभ होईल. त्यादृष्टीने खासदार संजयकाका पाटील प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांनी पाणी मिळावे यासाठी पाणीपट्टीचे पैसे जमा करून ठेवले आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न लवकरच सुटेल असा आशावाद व्यक्त केला. देशमुख म्हणाले, आटपाडी तालुक्याचा आमदार झाल्याशिवाय दुष्काळी आटपाडीचा पाणी प्रश्न सुटणार नाही असे मत नेतेमंडळींची झाले आहे. त्यामुळे आटपाडी खानापूर आणि विसापूर या खानापूर विधानसभा मतदार संघातील नेतेमंडळींनी राजकीय व्यूहरचना केली आहे. त्यादृष्टीने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र आटपाडीचा उमेदवार कोण? याबाबत मात्र त्यांनी सस्पेन्स ठेवला. अमरसिंह देशमुख भाजपमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांचा प्रचार केला. राज्यात भाजप शिवसेना युती होणार की नाही? याची चर्चा रंगली आहे. भाजपचे समाजकल्याण मंत्री सुरेश खाडे यांनी आटपाडीत भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीची तयारी करा असे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपतर्फे आटपाडी तालुक्यातून कोण उमेदवार? निवडणुकीसाठी उभा राहणार याबद्दल देशमुखांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले. वंचित बहुजन आघाडी मध्ये गोपीचंद पडळकर आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुक सांगोला, जत, खानापूर  या मतदारसंघातून निवडणूक लढवावी याची चर्चा सुरू आहे. यापूर्वी अमरसिंह देशमुख यांनी भाजपचे तिकीट मिळवा तुम्हाला घरातून आणून आमदार करतो अशी घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. त्यामुळे गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख यांच्या राजकीय भुमीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आटपाडी तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आदी पक्षांतून इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळावे म्हणून मागणी केली आहे. अशा राजकीय परिस्थितीत शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांना शह देण्यासाठी खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये कशा पद्धतीने राजकीय व्यूहरचना केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. अमरसिंह देशमुख यांनी आटपाडीचाच उमेदवार आमदार होईल असे सांगितल्यामुळे खात्रीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies