Type Here to Get Search Results !

विमुक्त भटक्या घटकांना घर आणि जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : आ. गणपतराव देशमुख

विमुक्त भटक्या घटकांना घर आणि जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : आ. गणपतराव देशमुख
महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त मंचच्या वतीने विमुक्त भटक्यांच्या विविध प्रश्नाचा जाहीरनामा सादर
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी: राज्यातील विमुक्त भटक्या समाजाचे विविध प्रश्न आहेत त्यांना घर आणि घरासाठी गायरानची जागा मिळावी असे आश्वासन सांगोल्याचे आमदार डॉ. गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त मंच च्या कार्यकर्त्यांना दिले. महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त मंचच्या वतीने आमदार देशमुख यांना विमुक्त भटक्यांच्या विविध प्रश्नाचा जाहीरनामा देण्यात आला. यावेळी सांगोला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा स्वातीताई मगर,डॉ. आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेच्या प्रभा यादव, सोनम काटे,चंद्रभागा माने, कल्पना माने,उषा तारलेकर आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या प्रभा यादव यांनी सांगितले कि,सांगोला शहरातील संजय नगर झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या अनेक विमुक्त भटके कुटुंबातील लोकांचा घर आणि घरासाठी जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. डॉ. आंबेडकर संस्था या प्रश्नांना घेऊन सातत्याने पाठपुरावा करत आहे. शासनाच्या वतीनेही विमुक्त भटक्यांचे प्रश्न सोडवण्यास उदासीनता दिसत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात विमुक्त भटक्यांच्या प्रश्नांचा समावेश करावा व ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी राज्यातील विविध पक्षाचे आमदार खासदार यांना विमुक्त भटक्या समाजाचा जाहीरनामा विविध संस्था संघटनाच्या वतीने देण्यात येणार आहे. देशामध्ये भटक्या विमुक्त जातीत जन्माला आलेले बहुसंख्य लोक हे सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक विकासापासून कोसो दूर आहेत. भारत सरकारने २००६ साली ‘राष्ट्रीय भटके विमुक्त आयोग’ बाळकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला. नंतर या आयोगाला कच-याची पेटी दाखवण्यात आली आणि महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांच्या सर्व भटक्या विमुक्त समाजाच्या माथी निराशाच आली. 
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही  आपल्या देशातील भटक्या विमुक्त समाजातील पुरुषांसोबत महिलाही  सामाजिक, राजकीय, आर्थिक दृष्टया मागास असलेल्या आजही दिसून येत आहेत. आधुनिकरणाचा भटक्यां व विमुक्तांच्या  आचार-विचारांवर अद्याप परिणाम झालेला नाही. अलिप्तपणामुळे त्यांच्यात मागासलेपणा दिसून येतो. म्हणून त्यांना भेडवसाणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय लक्षात घेणे आवश्यक ठरते. देशातील जाती धर्माच्या व लिंगाच्या आधारावरील विषमता दिवसेंदिवस वाढत चालली आहे अन या परस्थितीत देशातील भटका समाज, त्या समाजातील  महिला, लहान बालके त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित राहिली आहेत. उपजीविकेचे साधन नसल्यामुळे गावगाडयातील आर्थिक व्यवहारात भटक्यां जमातीना कोणतेच स्थान नाही. परिस्थितीच्या दबावामुळे किंवा आर्थिक विपन्नावस्थेमुळे काही भटक्या जमाती गुन्हेगारीकडे वळल्या जात आहेत. गुन्हेगार जमात म्हणून अनेक ठिकाणी यांना अन्याय अत्याचाराला बळी पडावे लागते. अन याच मानसिकतेतून राईनपाड्या सारख्या घटना देशात घडत आहेत. भारतीय संविधानातील समता, समानता, सामाजिक न्याय या मूल्यापासून हा घटक कोसो दूर आहे.  या समाजतील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाणही खूप आहे.  महिलांच्या आरोग्याचे प्रश्नही खूप मोठया प्रमाणात आहेत. भटक्यांचे भटकेपण सुटण्यासाठी आणि सुस्थिर व व्यवस्थित जीवन जगणे त्यांना सुलभ व्हावे म्हणून त्यांना स्थिर करणे महत्वाचे आहे. विविध योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे  गरजेचे आहे. या घटकाची नेमकी लोकसंख्या किती आहे हे सांगता येत नाही. या घटकासाठी असलेली निधीची तरतूद त्याप्रमाणात खर्च होत नाही. विमुक्त भटके समाजासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटची तरतूद करून बजेट अंमलबजावणीचा कायदा आमलात येणे आवश्यक असून या जाहीरनाम्याच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांपर्यंत विमुक्त भटक्यांच्या समस्या पोहचवणार असल्याचेही प्रभा यादव यांनी सांगितले. यावेळी स्वाती ताई मगर यांनी सांगितले कि,सांगोला नगरपालिकेच्या वतीने संजयनगर भागातील लोकांना घरे व घरासाठी जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या भागातील लोकांच्या घरांचा व जागेचा सर्वे केला असून या घटकातील लोकांना घरे व घरासाठी जागा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.  यावेळी संजयनगर सांगोला येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies