Type Here to Get Search Results !

आता पुरं झालं सरकारचं! आमचं आम्हीच काम केलं रस्त्याचं! : पुळकोटी येथील ग्रामस्थांनी केली ३ किमी रस्त्याची डागडुजी


माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करुनही काहीच दखल घेतली जात नसल्याचे निदर्शनास येताच शेवटी गाव करील ते राव व सरकार करेल?  या युक्तीची प्रत्यक्षात प्रचिती पुळकोटी येथील ग्रामस्थांनी देत एकजुटीने तब्बल तीन किलोमिटर अंतराचा रस्ता श्रमदान करुन खड्डे मुक्त‌‌‌‌ करुन वाहतूकीस सुरक्षित केला. 
म्हसवड शहराच्या दक्षिण दिशेस पाच किलोमिटर अंतरावर सुमारे चार हजार लोकसंख्येचं पुळकोटी हे गाव. या गावातूनच पुढे जाणाऱ्या रस्त्यावरच‌ दक्षिण दिशेस  जांभूळणी, श्री.भोजलिंग देवस्थान मंदीर, काळचौंडी व सांगली जिल्ह्यातील झरे तर पश्चिमेस पाणवन, वळई, विरळी, चिल्लारवाडी, वडजल‌ हि गावे म्हसवडला जोडली गेलेली आहेत. याबरोबरच जिल्ह्यात विक्रमी संख्येने जनावरे असलेली माणदेशी चारा छावणी‌‌ देखील याच‌ रस्त्यावर आहे. यामुळे या रस्त्यावरुन नियमित वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. 
म्हसवड ते पुळकोटी दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडून हा रस्ताच वाहतूकीस धोकादायक झाला. या रस्त्याची जिल्हा परिषदेने दुरुस्ती करावी यासाठी पुळकोटीसह‌ संबंधित गावातील ग्रामस्थ व‌ चारा छावणीतील शेतकऱ्यांनी मागणी केली होती. राज्याचे महसूल व पुनर्वसन मंत्री‌ चंद्रकातदादा पाटील, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आदींनी जेव्हा जेव्हा चारा छावणीस भेटी दिल्या तेव्हा-तेव्हा या रस्त्याची समस्यांचे गाऱ्हाणे गावोगावच्या ग्रामस्थांनी त्यांच्यापढे मांडले. तत्पुर्वीही म्हसवड यात्रा नियोजनासाठी आयोजित जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीतही हाच विषय खुपच‌ ताणला गेला होता. तरीही या रस्त्याची काहीच‌ डागडुजी केली गेली नाही. 
शेवटी येथील  हरिचंद्र माने, आबा सावंत, हिंदुराव सावंत, हिंदुराव यादव, सतीश गलंडे, दादा सावंत, विजय सावंत, बजरंग गलंडे, बाळू बनगर, पप्पू पिंजारी, दादासो गलंडे, भरत साठे, रणजित चव्हाण, आबा चव्हाण, अरुण साठे इत्यादीं ग्रामस्थांनी बैठकीत निर्णय घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करुन घेण्यासाठी यापुर्वी खर्ची पडलेले दिवस पाहता 'आता पुरं झालं गाव करील ते राव काय करतील?' या म्हणीप्रमाणे आपणच श्रमदान करुन  हा रस्ता खड्डेमुक्त‌ करण्याचा‌ निर्णय‌ सर्वानुमते घेतला. या निर्णयाचे सरपंच सौ.मंदाकिनी सावंत यांनी स्वागत केले व त्यानंतर गावातीलच ग्रामस्थ आबा चव्हाण, सतीश गलंडे, पप्पू पिंजारी व कारंडे यांनी स्वत:चे ट्रॉलीसह चार ट्रॅक्टर तर बापू बनगर यांनीही स्वत:चा जेसीबी उपलब्ध करुन दिला व सुमारे साठ ट्रॉली मुरमाची वाहतूक करुन तीन किलोमिटर अंतराच्या रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे व रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईटपट्ट्या मुरमांनी भरुन घेण्यास गावातील‌ सुमारे साठ ते सत्तर ग्रामस्थांनी श्रमदान केले व हा रस्ता केवळ सहा तासातच वाहतुकीस‌ सुरक्षित असा दुरुस्त करुन गाव करतील ते राव काय करतील हे दाखवून दिले.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies