राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे:- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 21, 2019

राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे:- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


माणदेश एक्सप्रेस न्यूज  
सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करावे, तसेच काय करू नये या बाबींची सखोल माहिती करून घेऊन त्याचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिले.
विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, 282-सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे, निवडणूक खर्च संनिंयंत्रण समितीचे नोडल अधिकारी राजेंद्र गाडेकर, अविनाश जाधव, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सामान्य माणसाचा शांततापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार अबाधित राहील याची दक्षता सर्व राजकीय पक्षांनी घ्यावी. सार्वजनिक शांतता भंग होणार नाही अशा पध्दतीने प्रचार करणे बंधनकारक आहे.  विद्यार्थ्यांच्या सहामाही परिक्षांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.  उमेदवारांनी विहित खर्च मर्यादेचे पालन करावे. तसेच, प्रचार करताना आवश्यक विविध परवानग्या घ्याव्यात. निवडणूक काळातील सर्व आवश्यक परवानग्या एक खिडकी योजनेंतर्गत विहीत मुदतीत घ्याव्यात. मंत्री महोदय व लोकप्रतिनिधी यांच्या निवडणूक काळातील प्रचार दौऱ्यासाठी शासकीय वाहने वापरू नयेत. भित्तीपत्रके, पोस्टर्स, हँडबिले याबाबत आवश्यक परवानग्या घ्याव्यात. प्रचारसभा, प्रचारफेऱ्या पूर्वपरवानगीशिवाय घेऊ नयेत. जात, धर्म, भाषा यांच्या आधारे प्रचार करू नये. जातीय किंवा धार्मिक ध्रुवीकरण होईल असा प्रचार करू नये, असे ते म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक माध्यमातील निवडणूक विषयक जाहिराती माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणीकरण केल्याशिवाय प्रसारीत करण्यात येवू नयेत. बल्क एसएमएस, व्हाईस एसएमएस, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टी.व्ही., केबल चॅनेल,रेडिओ एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, ऑडिओ व्हिडीओ डिस्प्लेज यासह सोशल मीडियावरून व इंटरनेट वेबसाईटवरून करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना माध्यम प्रमाणिकर सनिंयंत्रण समितीचे प्रसिध्दीपूर्व प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. तसेच मुद्रित माध्यमांतून मतदानाच्या अगोदरच्या दिवशी व मतदाना दिवशी प्रसिध्दीस देण्यात येणाऱ्या जाहिराती पूर्व प्रमाणिकरण करणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आचारसंहिता, दरपत्रक आदि विषयांवर राजकीय पक्ष प्रतिनिधींनी चर्चा केली.

No comments:

Post a Comment

Advertise