सांगली भाजप जिल्हाध्यक्षांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा: मतदार व कार्यकर्त्यांना पाच लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा आली अंगलट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, April 1, 2019

सांगली भाजप जिल्हाध्यक्षांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा: मतदार व कार्यकर्त्यांना पाच लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा आली अंगलट

सांगली भाजप जिल्हाध्यक्षांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
माणदेश एक्सप्रेस न्यूज
सांगली : भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना ज्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य मिळेल, त्या मतदारसंघातील मतदार व कार्यकर्त्यांना पाच लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याविरुध्द मिरजेत निवडणूक विभागाने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. प्रचार मेळाव्यातील देशमुख यांच्या भाषणाबद्दल आचारसंहिता कक्षप्रमुख गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांनी मतदारांना पैशाचे आमिष दाखविल्याची फिर्याद शनिवारी मिरज शहर पोलिसांत दिली आहे.
भाजपचे सांगली लोकसभेचे उमेदवार खा.संजय पाटील यांच्या प्रचारासाठी बुधवारी मिरजेत प्रचार मेळावा झाला. त्यात जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले. मागील लोकसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदारसंघातून भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते, मात्र यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत भाजपला मताधिक्य देण्यासाठी जोरदार स्पर्धा असून, मिरजेसोबत अन्य मतदारसंघही मताधिक्य देण्याच्या तयारीत आहेत. विरोधकही भाजपच्या प्रचारात आहेत, असा दावा देशमुख यांनी केला होता.
शिवाय लोकसभेसाठी सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या विधानसभा मतदार संघाला पाच लाखांचे बक्षीस मिळणार असल्याचे देशमुख यांनी मेळाव्यात जाहीर केले. ही पक्षांतर्गत स्पर्धा असल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता. दरम्यान, देशमुख यांच्या भाषणाची ध्वनिचित्रफित सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर चर्चा सुरू झाली. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी मताधिक्यासाठी पाच लाखाचे बक्षीस जाहीर केल्यामुळे प्रचार मेळाव्यातील भाषणे तपासून कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.
त्यानुसार जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याविरुध्द मतदारांना पैशाचे आमिष दाखविल्याबद्दल आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे भाजपचे नेते अडचणीत आले आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise